कोलकाता। आज ईडन गार्डनवर कर्नाटक विरुद्ध विदर्भ यांच्यात रंगलेल्या अटीतटीच्या रणजी उपांत्य सामन्यात विदर्भाने ५ धावांनी विजय मिळवून पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली आहे.
विदर्भाकडून रजनीश गुरबानीने दुसऱ्या डावात ७ बळी घेऊन विदर्भाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. कर्नाटकने पहिल्या डावात ११६ धावांची आघाडी घेतली होती परंतु विदर्भाने दुसऱ्या डावात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर उत्तम कामगिरी बजावली. या जोरावर त्यांनी आठवेळाच्या विजेत्या कर्नाटक समोर दुसऱ्या डावात १९८ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
आज दुसऱ्या डावात कर्नाटकने ७ बाद १११ धावांपासून खेळायला सुरुवात केली. त्यांना आज जिंकण्यासाठी अजून ८७ धावांची आवश्यकता होती तर विदर्भाला ३ बळींची गरज होती. त्यामुळे दोन्हीही संघ आज जिंकण्याच्याच इराद्याने खेळत होते.
काल कर्नाटकचे नाबाद असणारे फलंदाज विनय कुमार आणि श्रेयश गोपाळ(२४*) यांनी आज सावध सुरुवात केली या दोघांनी मिळून ३७ धावांची भागीदारी रचली पण विनय ३६ धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतरही अभिमन्यू मिथुनने (३३) श्रेयशची योग्य साथ देताना ९ व्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली.
परंतु अभिमन्यू कर्नाटकला विजयासाठी ९ धावांची गरज असताना बाद झाला. त्यानंतर लगेचच श्रीनाथ अरविंदला(२) गुरबानीने बाद केले आणि विदर्भाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.
विदर्भाकडून दुसऱ्या डावात गुरबानी(७/६८), उमेश यादव(१/६५) आणि सिद्देश नेरळ(२/३७) यांनी बळी घेऊन कर्नाटकचा दुसरा डाव १९२ धावांवर गुंडाळला.
विदर्भ २९ डिसेंबर ते २ जानेवारीला दिल्ली विरुद्ध अंतिम सामना खेळेल.
संक्षिप्त धावफलक:
विदर्भ पहिला डाव: सर्वबाद १८५ धावा
कर्नाटक पहिला डाव: सर्वबाद ३०१ धावा
विदर्भ दुसरा डाव: सर्वबाद ३१३ धावा
कर्नाटक दुसरा डाव: सर्वबाद १९२ धावा
सामनावीर: रजनीश गुरबानी
(पहिला डाव: ५ बळी, दुसरा डाव: ७ बळी)