मुंबई । भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग हा अफलातून स्टायलिश खेळाडू. त्याचा स्वभावाप्रमाणे मैदानावरचा वावर नेहमीच आक्रमक असायचा. मधल्या फळीत खेळताना तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन बऱ्याच वेळा संघाला अशक्यप्राय विजय मिळवून द्यायचा. एकाच शब्दात सांगायचं झालं तर ‘अनस्टॉपेबल’ असेच वर्णन करता येईल.
भारताला दोन विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारा युवराज सिंग एक वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. निवृत्तीनंतर काही काळ तो टी20 आणि टी10 लीगमध्ये खेळताना दिसून आला. निवृत्तीनंतर आपला आयुष्य कसं आहे? याची माहिती गौरव कपूरबरोबरील एका मुलाखतीत दिली.
तो म्हणाला, ” निवृत्तीनंतरचं आयुष्य कसं आहे हे मला शब्दात सांगता येत नाही. हा भावूक करणारा क्षण आहे. निवृत्तीनंतर खूप आरामदायी वाटले. कित्येक वर्षांच्या नंतर मला शांत झोप लागली आहे. क्रिकेट खेळत असताना अशी झोप मला कधीच लागत नव्हती. आज मला स्वतंत्र वाटत आहे. एकवेळ माझ्यावर अशी आली की, मी मानसिक दबावामध्ये होतो. क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी की न घ्यावी? ती कधी घेतली पाहिजे, या विचारात सतत असायचो.”
“कधी-कधी मी या खेळाला मिस देखील करतो. पण पूर्वीइतका क्रिकेटला मिस करत नाही. कारण बरीच वर्ष मी क्रिकेट खेळलो. माझे चाहते मला अनेकदा संदेश पाठवत असतात. त्यामुळे खूप आनंद वाटतो. या खेळाने मला नेहमीच सन्मान दिला आहे. त्याबद्दल मला खूपच अभिमान आहे.”
निवृत्तीनंतर युवराजसिंग कॅनडा ग्लोबल टी10 लीगमध्ये खेळताना दिसून आला. या लीगचा त्याने मनमुराद आनंद लुटला. याविषयी बोलताना तो म्हणाला की, ” कॅनडामध्ये खेळताना मला खूप मजा आली. कॅनडामध्ये खेळताना कधी मी पंजाबपासून दूर आहे, असे वाटले नाही.”
युवराज सिंगने भारताकडून 304 वन डे, 40 कसोटी आणि 58 टी 20 सामने खेळले आहेत. वनडेत 33.93 च्या सरासरीने 8702 धावा केल्या. कसोटीत 36.56 च्या सरासरीने 1990 धावा केल्या. टी 20 मध्ये 28.02 च्या सरासरीने 1177 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत 9, वनडेत 111, टी 20 मध्ये 28 बळी टिपले.
ट्रेंडिंग घडामोडी –
सचिनला कर्णधार बनवणाऱ्या ‘या’दिग्गज खेळाडूंची आज ८१ वी जयंती
डिविलियर्स, डूप्लेसिस, रबाडा सारख्या दिग्गजांचा समावेश असलेली ही अनोखी स्पर्धा स्थगित
मॅक्सवेलला बाद करण्यासाठी एमएस धोनीने सांगितली होती ‘ही’ आयडिया