भारतीय वरिष्ठ संघाला या वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. त्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ भारत अ संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाठवणार आहे. त्यासाठी भारत अ संघाची निवड देखील काहीदिवसांपूर्वी करण्यात आली होती. आता या दौऱ्यासाठी भारत अ संघात अष्टपैलू हनुमा विहारीचा समावेश करण्यात आला आहे.
यापूर्वी निवड समीतीने १४ खेळाडूंचा भारत अ संघ निवडला होता. आता शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) या संघात विहारीचा समावेश झाल्याने हा १५ सदस्ययी संघ झाला आहे. या संघाचे कर्णधारपद प्रियांक पांचाळ यांच्याकडे असून या संघात पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईश्वरन, बाबा अपराजित, देवदत्त पडीक्कल, सर्फराज खान अशा फलंदाजांना, तर नवदीप सैनी, इशान पोरेल, अर्जन नागवासवाला, राहुल चाहर, कृष्णप्पा गॉथम अशा गोलंदाजांनाही संधी मिळाली आहे. दरम्यान, आयपीएल २०२१ मध्ये आपल्या वेगवान चेंडूंनी लक्ष वेधलेल्या उम्रान मलिक याला देखील या संघात संधी देण्यात आली आहे. यष्टीरक्षणाची जबाबदारी उपेंद्र यादवकडे असणार आहे.
भारत अ संघाला ३ चार दिवसीय कसोटी सामने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळायचे आहेत. हे तिन्ही सामने ब्लोएमफॉन्टेन येथे होणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान होईल आणि तिसरा सामना ६ ते ९ डिसेंबर दरम्यान होणार आहे.
या मालिकेनंतर भारताच्या वरिष्ठ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होईल. भारतीय वरिष्ठ संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ३ कसोटी, ३ वनडे आणि ४ टी२० सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून विहारीला वगळलं
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारताचा वरिष्ठ संघ न्यूझीलंडविरुद्ध ३ टी२० आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील कसोटी मालिकेसाठी शुक्रवारी भारतीय संघ निवडण्यात आला असून विहारीला या संघातून वगळण्यात आले होते. पण असे असले तरी आता त्याला दक्षिण आफ्रिदा दौऱ्यासाठी भारत अ संघात निवडले गेल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील चार दिवसीय कसोटी मालिकेसाठी भारत अ संघ –
प्रियांक पांचाळ (कर्णधार), पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, सर्फराज खान, बाबा अपराजित, उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), के गॉथम, राहुल चाहर, सौरभ कुमार, नवदीप सैनी, उम्रान मलिक, इशान पोरेल, अर्जन नागवासवाला, हनुमा विहारी.
महत्त्वाच्या बातम्या –
खिलाडूवृत्ती! स्टार्कचा खतरनाक बाउंसर रिझवानच्या हेल्मेटवर आदळताच ऍरॉन फिंचने केली मन जिंकणारी कृती
दे घुमा के! डेविड वॉर्नरने दोन टप्पे पडून आलेल्या चेंडूवर ठोकला षटकार, पाहा व्हिडिओ
पराभव पचेना! पाकिस्तान ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल हारला आणि दु:खात चाहता दुबईच्या मैदानातच झोपला