-अतुल वाघमारे
क्रिकेटचे ‘जनक’ म्हटले जाणाऱ्या इंग्लंडला ४४ वर्षांनंतर पहिल्यांदाच विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून देण्यात अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने महत्त्वाची भूमिका बजावली होती. उजव्या हाताने गोलंदाजी आणि डाव्या हाताने फलंदाजी करणारा स्टोक्स आज (४ मे) आपला २९वा वाढदिवस साजरा करत आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्टोक्सचा जन्म १९९१मध्ये न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथे झाला होता.
स्टोक्सने (Ben Stokes) आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरवात २०११मध्ये आयर्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यातून केली होती. त्याचबरोबर त्याने २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना कसोटीत पदार्पण केले होते. न्यूझीलंडमध्ये जन्मलेल्या स्टोक्सची गणना आज सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते.
स्टोक्सने इंग्लंडकडून खेळताना आतापर्यंत ६३ कसोटी सामने, ९५ वनडे सामने आणि २६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ३६.५४ च्या सरासरीने ४०५६ धावा केल्या आहेत. यामध्ये ९ शतकांचा समावेश आहे. तसेच कसोटीत त्याने १४७ विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच वनडेत त्याने ४०.६३ च्या सरासरीने २६८२ धावा केल्या आहेत. त्यात ३ शतकांचा समावेश आहे. तसेच वनडेत त्याने ७० विकेट्सही घेतल्या आहेत.
खेळाच्या म्हणजेच क्रिकेटच्या सर्वात लहान प्रकारात (टी२०) त्याने केवळ ३०५ धावा केल्या आहेत. शिवाय त्यात त्याने १४ विकेट्सही घेतल्या आहेत.
स्टोक्सच्या वाढदिवसाबद्दल त्याच्या आयु्ष्यातील काही रंजक गोष्टींचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे. Some interesting facts about Ben stokes on his birthday.
अशाप्रकारे मिळवून दिले इंग्लंडला विश्वचषकाचे विजेतेपद
विश्वचषक २०१९चा अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात पार पडला होता. त्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २४१ धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडसमोर २४२ धावांचे आव्हान होते. परंतु इंग्लंड संघाला सर्वबाद २४१ धावाच करता आल्या आणि सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे त्या सामन्यात ‘सुपर ओव्हर’ घेण्यात आली होती. ‘सुपर ओव्हर’मध्ये इंग्लंडने न्यूझीलंडसमोर १६ धावांचे आव्हान दिले. परंतु ‘सुपर ओव्हर’मध्येही सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे शेवटी सामन्यात सर्वाधिक चौकार लावल्यामुळे इंग्लंड संघाला विजेतेपदावर आपले नाव कोरता आले.
विश्वचषकाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले, जेव्हा अंतिम सामना ‘सुपर ओव्हर’मध्ये गेला. त्या अंतिम सामन्यात इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम स्टोक्सने केला. त्याने ९८ चेंडूचा सामना करताना २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ८४ धावा केल्या होत्या. स्टोक्सने यष्टीरक्षक जॉस बटलरबरोबर ५व्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी करत संघाला सावरले. बटलरने त्या सामन्यात ६० चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या होत्या.
‘सुपर ओव्हर’मध्येही इंग्लंडने स्टोक्स आणि बटलरवर विश्वास टाकत त्यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी सोपविली. स्टोक्सनेही संघाला ‘सुपर ओव्हर’मध्ये निराश केले नाही. त्याने ३ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने ८ धावा केल्या होत्या.
विश्वचषक जिंकल्यानंतर वडिलांची प्रतिक्रिया
स्टोक्स जेव्हा १३ वर्षांचा होता, तेव्हा त्याचे कुटुंब इंग्लंडमध्ये स्थायिक झाले होते. त्याचे वडील जेरार्ड स्टोक्स (Gerard Stokes) रग्बी खेळाडू आणि प्रशिक्षक राहिले आहेत. स्टोक्सला खेळ आपल्या वडिलांचा वारसा म्हणून मिळाला आहे.
विश्वचषकात स्टोक्सच्या उत्तम कामगिरीने इंग्लंडच्या चाहत्यांना अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच असा आनंद साजरा करण्याची संधी दिली होती. परंतु न्यूझीलंडमध्ये बसलेले स्टोक्सच्या वडिलांनी म्हटले होते की, “मी न्यूझीलंडच्या पराभवाने खूप दु:खी आहे आणि ही खूप दु:खाची बाब आहे, की एका संघाला ट्रॉफीविनाच आपल्या देशात परतावे लागत आहे. काळजावर हात ठेवून सांगायचं झालं, तर मला स्टोक्स आणि त्याच्या संघाबद्दल आनंद आहे. परंतु मी आताही न्यूझीलंडचाच समर्थक आहे. स्टोक्सने खूप मेहनत घेतली होती आणि त्याचे फळ त्याला विजयाच्या रुपात मिळाले.”
ऍशेसमध्ये केला पराक्रम
मागील वर्षी ऍशेस मालिकेत स्टोक्सची कामगिरी प्रशंसा करण्याजोगी होती. हेडिंग्ले कसोटीमध्ये त्याने अविस्मरणीय खेळी केल्या होत्या. लीड्सच्या मैदानात उत्कृष्ट खेळी करत त्याने इंग्लंडला केवळ पराभवातून बाहेर काढले नाही, तर ऍशेस मालिकेत १-१ने बरोबरीही केली होती. स्टोक्सने नाबाद १३५ धावांची खेळी केली होती. पहिल्या डावात इंग्लंड संघ केवळ ६७ धावांवर संपुष्टात आला होता. ७१ वर्षांमधील ही त्यांची सर्वाधिक कमी धावसंख्या होती. दुसऱ्या डावात विजयासाठी इंग्लंडला ३५९ धावांची आवश्यकता होती. परंतु त्यांना केवळ ९ बाद २८६ धावाच करता आल्या होत्या. विजयासाठी आणखी ७३ धावांची आवश्यकता होती. परंतु स्टोक्सने साडे पाच तासांची नाबाद १३५ धावांची धडाकेबाज खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला होता.
जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू- २०१९
विस्डेनने इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या २०१९ विश्वचषक आणि ऍशेसमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या स्टोक्सला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले होते. विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅकने २०२०च्या आपल्या आवृत्तीमध्ये स्टोक्सच्या कामगिरीसाठी त्याला हा सन्मान दिला आहे. हा पुरस्कार २००३ पासून सुरू झाला होता, त्यानंतर इंग्लंडकडून हा पुरस्कार मिळविणारा स्टोक्स केवळ दुसराच क्रिकेटपटू आहे. त्याच्यापूर्वी अँड्र्यू फ्लिंटॉफला हा पुरस्कार सन्मान मिळाला होता.
मिळाले आहेत महत्त्वाचे सन्मान
स्टोक्सला आयसीसी विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाच्या सदस्यांंबरोबर ब्रिटनच्या ‘नवीन वर्षाच्या सन्मान यादी’त स्थान देण्यात आले आहे. या सर्वांना राणी एलिझाबेथ द्वितीयने सन्मानित केले आहे. स्टोक्सला ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एंपायर’ या सन्मानासाठीही निवडले होते.
संपवले विराटचे तीन वर्षांचे वर्चस्व
विस्डेन क्रिकेट अल्मनॅकच्या २०२० च्या आवृत्तीत ‘जगातील आघाडीचा क्रिकेटपटू’ म्हणून स्टोक्सची निवड करण्यात आली होती. मागील ३ वर्षांमध्ये सातत्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला ‘जगातील आघाडीचा क्रिकेटपटू’ म्हणून निवडले जात होते. विस्डेन क्रिकेट अल्मनॅकने २०२०च्या आपल्या आवृत्तीत २०१९च्या कामगिरीसाठी स्टोक्सला हा सन्मान दिला, जो तीन वर्षांपासून विराटला मिळत होता.
स्टोक्स होता बॅड बॉय
स्टोक्स इंग्लंड क्रिकेटचा बॅड बॉयदेखील राहिला आहे. २०१६मध्ये ब्रिस्टलच्या एका नाईट क्लबच्या बाहेर भांडण केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती आणि ते प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली होती. या विवादामुळे त्याला ऍशेस मालिकेतून बाहेर रहावे लागले होते. तसेच इंग्लंडमध्ये ४ वेळा वेगाने गाडी चालविल्यामुळे तो दोषी आढळला होता. २०११मध्ये तो दारूच्या नशेत डरहममध्ये वाहतूक पोलिसांशी भिडला होता.
विवादांशी जुने नाते
स्टोक्सचे विवादांशी खूप जुने नाते आहे, त्यामुळे त्याची वाईट प्रतिमा तयार झाली होती. त्याने नाईट क्लब फाईट व्यतिरिक्त आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात विंडीजविरुद्ध विवादात सापडला होता. जेव्हा एकही धाव न घेता बाद झाल्यानंतर रागात त्याने ड्रेसिंग रूममधील भिंतीवर बुक्की मारली होती. खरंतर बोट फ्रॅक्चर हे त्या विवादाचे कारण होते. त्याच्याबरोबर खेळाडूही त्याची थट्टा करत होते.
कमिन्सपूर्वी स्टोक्स होता आयपीएलमधील सर्वात महागडा परदेशी खेळाडू
आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) १५.५० कोटी रुपयांना आपल्या संघात सामील केले होते. अशाप्रकारे तो आयपीएलमधील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. कमिन्सपूर्वी हा विक्रम स्टोक्सच्या नावावर होता. त्याला राजस्थान रॉयल्सने १४.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
वाचनीय लेख-
-जेव्हा क्रिकेटमधील सर्वात सभ्य गृहस्थाच्या घरात शिरते अनोळखी मुलगी
-असे क्रिकेटर होणे नाही! जखमी अवस्थेत देशासाठी मैदानावर उतरलेले ५ दिग्गज खेळाडू