भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आज (6 डिसेंबर) आपला 34 वा वाढदिवस साजरा करतोय. 12 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने आपल्या गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना लोळवलं. एव्हढेच नव्हे,तर फलंदाजीतही त्याने अनेक उत्कृष्ट डाव खेळले आहेत.
रवींद्र जडेजाने 8 फेब्रुवारी 2009 रोजी वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करत दाखवून दिले की, तो गोलंदाजीसह फलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी करू शकतो. या लेखात आपण त्याने खेळलेल्या 3 उत्कृष्ट खेळींबद्दल माहिती घेणार आहोत.
इंग्लंडविरुद्ध कसोटीत केली 90 धावांची खेळी
मोहाली येथे नोव्हेंबर 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची परिस्थिती बिकट होती. अवघ्या 204 धावांत 6 गडी बाद झाले होते. अशा परिस्थितीत जडेजाने 90 धावांची उत्कृष्ट खेळी करत पहिल्या डावात भारतीय संघाला 134 धावांची आघाडी मिळवून दिली. त्याने आर अश्विनसह 7 व्या विकेटसाठी 97 धावांची भागिदारी केली होती.
या कसोटीत भारतीय संघाने विजय मिळवला होता आणि जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
इंग्लंडविरुद्ध वनडेत केल्या 78 धावा
इंग्लंडविरुद्ध, 9 सप्टेंबर 2011 रोजी झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात अवघ्या 58 धावांवर निम्मा भारतीय संघ तंबूत परतला होता. मात्र, त्या कठीण परिस्थितीत अष्टपैलू रवींद्र जडेजाने कर्णधार एमएस धोनीसह सहाव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली होती. धोनी तंबूत परतल्यावरही तो खेळपट्टीवर टिकून राहिला आणि गोलंदाजांसाठी उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवर भारताला 234 ही आव्हानात्मक धावसंख्या गाठण्यास मदत केली.
या सामन्यात जडेजाने 89 चेंडूत 78 धावांची जबरदस्त खेळी केली होती. इंग्लंडने डकवर्थ लुईस नियमानुसार या सामन्यात विजय मिळवला होता. मात्र, इंग्लंडच्या विजयानंतरही जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौवरवण्यात आले.
न्यूझीलंडविरुद्ध वनडेत केली 66 धावांची उत्कृष्ट खेळी
न्यूझीलंडविरूद्ध, 25 जानेवारी 2014 रोजी झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात 315 धावांचा पाठलाग करताना भारताने 184 धावांत 6 गडी गमावले. अष्टपैलू रवींद्र जडेजाने आर अश्विनबरोबर 130 धावांची भागीदारी केली आणि अश्विन बाद झाल्यावर अंतिम षटकात संघाला विजयाच्या जवळ नेले.
अंतिम तीन चेंडूंत भारताला 12 धावांची गरज होती. जडेजाने षटकातील चौथ्या चेंडूवर जडेजाने चौकार ठोकला आणि नंतर षटकार ठोकला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेत सामना बरोबरीत केला. त्याने या सामन्यात नाबाद 66 धावा केल्या.
या सामन्यातही जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
भारताच्या ‘या’ ५ दिग्गज क्रिकेटपटूंचा आज आहे वाढदिवस