काल धोनीचा वाढदिवस झाला. धोनीवर प्रेम करणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांनी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलेलं यश पाहिलंय. साहजिकच ते धोनीचे गोडवे गातात. गायलेही पाहिजेत. त्याचं कर्तृत्व तेवढं मोठं आहे देखील. मात्र, या सगळ्याची पायाभरणी दादाने केली होती.
दादाकडे कर्णधारपद आलं तेव्हा भारतीय संघ एका मोठ्या धक्क्यातून सावरत होता. अशा परिस्थतीत दादाने संघाची मोट बांधायला सुरुवात केली.नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देत त्याने भारतीय संघाला विजयाची सवय लावली. भारतीय संघ म्हणजे ‘घरके शेर’ हा शिक्का पुसण्यात दादाच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. क्रिकेट म्हणजे सभ्य गृहस्थांचा खेळ असला तरी वेळ पडेल तेव्हा प्रतिस्पर्ध्याला सूनवायला दादाने मागेपुढे पाहिले नाही. भारतीय कर्णधार आणि संघाकडून असे वागणे सगळ्यांनाच धक्का देणारे होते. दादाने त्याची पर्वा कधीच केली नाही. त्याने कायम ‘अरे’ला ‘का रे?’ नेच प्रत्त्युत्तर दिले.
लोक धोनीच्या कप्तानीचे गोडवे गातात. धोनी हिरा आहे. पण दादा असे अनेक हिरे घडवणारा जवाहिरी आहे. भज्जी, सेहवाग, कैफ, गंभीर, झहीर, युवराज, नेहरा ह्या हिऱ्यांना शोधून त्यांना पैलू दादानेच पाडले. एकदा २०११ च्या विश्वविजेत्या संघावर नजर टाका. वर लिहिलेली सगळी नावं यादीत सापडतील. म्हणून दादा जवाहिरी!!
दादाच्या फलंदाजीबद्दल प्रश्न उपस्थित करणारे बरेच लोक आहेत.पण त्याच्या नेतृत्व गुणांची वाहवा करणारेसुद्धा तेवढेच आहेत. उगाच नाही त्याला ‘द मॅन हू चेंजड् इंडियन क्रिकेट’ असं म्हणतात. बाकी दादाला ‘ऑफसाईडचा बादशहा’ का म्हणतात हे कळण्यासाठी युट्युबवरच जावं.
दादावरचा लेख आणि नॅटवेस्ट सिरीजच्या फायनलबद्दल काहीच नाही असं होणं शक्य नाही. आज जवळपास १८ वर्षांनंतरही तो प्रसंग कित्येक भारतीयांना, क्रिकेट चाहत्यांना अगदी ठळकपणे आठवतो. एखादी घटना घडल्यानंतर १८ वर्षांनीसुद्धा तिचे महत्व कमी होत नाही यातच काय ते समजून घ्या. त्या दिवशीचा भारताचा विजय आणि दादाची शर्ट काढण्याची कृती क्रिकेट जगतात भारतीय संघ अवतरल्याची नांदी होती.
भारताच्या कसोटीमधील कामगीरी फारशी चांगली नव्हती. मात्र दादाच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटीत आठव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली. यात ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय म्हणजे सर्वोच्च. दादाची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे खेळाडूंवर त्याचा असलेला विश्वास. याचं एक उदाहरण म्हणजे सेहवागला सलामीला पाठवणे. त्यानंतर सेहवागने घातलेला राडा जगजाहीर आहे. अजून एक उदाहरण म्हणजे दादाने कुंबळेची केलेली पाठराखण. ऑस्ट्रेलियात कुंबळे चालणार नाही असे निवड समिती म्हणत असताना दादाने मात्र हट्टाने त्याला संघात घेतले. कुंबळेने त्या मालिकेत भारताकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.
दादाने द्रविडला विकेटकिपिंग करायला लावली म्हणून त्याच्यावर टीका झाली. स्वतः द्रविड कधीकधी मजेत दादाची यावरून हटाई करतो. पण दादाचा हा निर्णय भारतासाठी खूप फायदेशीर ठरला. याचे द्रविडच नक्कीच कौतुक पण दादाच्या या जुगार खेळत तो यशस्वी करून दाखविण्याच्या क्षमतेला हॅट्स ऑफ!
निवृत्तीनंतर दादाने समालोचन केलं. माईकवर त्याची इतर समालोचकांबरोबरची जुगलबंदी ऐकायला मजा येई. त्याने कॅबचे अध्यक्षपदही भूषवले. आता तो बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून दादागिरी करतोय. सगळे काही नीट झाले तर लवकरच तो आयसीसीचा अध्यक्ष होऊ शकतो. खेळाडू,कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी करणारा दादा एक उत्तम प्रशासकही आहे हे यातून दिसून येते.
दादाच्या यशाचे मोजमाप करायाला आकड्यांची, विश्वचषकाची फुटपट्टी लावली तर दादा कमी पडतो असे दिसते. मात्र तरीही दादाने आपल्या नेतृत्वगुणांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला ही बाब बदलत नाही. दादाची विजिगीषू वृत्ती, निडरपणा आणि विशेष म्हणजे आपल्या ह्या गुणांचा वापर करत संघात जान फुंकण्याची त्याची कला या गुणांमुळे भारतीय क्रिकेटची इमारत आज डौलात उभी आहे. धोनी नक्कीच यशस्वी आहे पण दादा शेवटी दादा आहे आणि दादाच राहील!
संबंधित बातम्या-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला