प्रो कबड्डीमध्ये काल १८ वा सामना झाला तो हरयाणा स्टीलर्स आणि गुजरात फॉरचूनजायन्टस या संघामध्ये. या सामन्यात हरियाणा संघाने गुजरातचा ३२-२० अश्या मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यात हरयाणा संघाचा डिफेन्स खूप चांगला खेळला. सुरेंदर नाडा ६ गुण, मोहित चिल्लर ७ गुण तर रेडींगमध्ये विकास कंडोला याने ६ गुण मिळवले आणि हरयाणा संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. गुजरातकडून ऑलराऊंडर सचिनने ८ गुण मिळवले आणि सामन्यावर आपली छाप पाडली.
पहिल्या सत्रात हरयाणा संघाने चांगली सुरुवात केली आणि पहिल्या २ मिनिटांत ३-० अशी बढत मिळवली आणि गुजरातच्या कर्णधार सुकेश हेगडेला बाद करण्यात यश मिळवले. पण १३ व्या मिनिटापर्यंत खेळ झाला तेव्हा सामन्यात दोन्ही संघ ७-७ अश्या बरोबरीवर होते. यानंतर हरयाणा संघाने सामन्यावर पकड मिळवली आणि पहिले सत्र संपले तेव्हा सामना १३-९ अश्या गुणांवर येऊन ठेपला.
दुसरे सत्र पूर्णपणे हरयाणा संघाच्या नावावर राहिले. दुसऱ्या सत्रातील ५ व्या मिनिटांपर्यंत सामन्यात १८-११ अशी बढत मिळवली. १३ व्या मिनिटाला गुजरातच्या महेंद्र राजपूतला बाद केल्यावर गुजरातच्या संघाला ऑल आऊट केले आणि सामन्यात १२-२२ अशी बढत मिळवली. शेवटी हा सामना ३२-२० अश्या स्थितीत येऊन संपला. हरियाणा संघाने दुसऱ्या सत्रात डिफेन्समध्ये उत्तम कामगिरी केली आणि या बळावर त्यांनी हा सामना जिंकला.
गुजरातच्या संघातील खेळाडूंना सामन्यात चांगला खेळ करता आला नाही. कर्णधार सुकेश हेगडे, फजल अत्राचली आणि राजेश नरवाल यांना चांगली कामगिरी बजावता आली नाही. याचा फटका गुजरात संघाला बसला आणि पराभवाला सामोरे जावे लागले.