भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग नेहेमीच एम एस धोनीवर टीका करत असतो. पण त्याने नुकतेच धोनीचे कौतुक करताना तो महान कर्णधार असल्याचे म्हटले आहे.
तो ChennaiSuperKings.com शी बोलताना म्हणाला, “एमएस धोनी बरोबर खेळायला नेहमीच चांगले वाटते. मी पुन्हा एकदा एकाच ध्येयासाठी त्याच्याबरोबर खेळणार आहे. यावेळी ते चेन्नई सुपर किंग्स संघाला ट्रॉफी जिंकून देण्यासाठी असेल.”
मागच्या महिन्यात पार पडलेल्या आयपीएल २०१८ च्या लिलावात गेले १० वर्ष मुंबई इंडियन्स संघातून खेळलेल्या हरभजनला यावर्षीच्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्सने संघात घेतले आहे.
हरभजन पुढे धोनीविषयी म्हणाला, “धोनीला खेळ खरंच चांगला समजतो. तो हुशार असून तो खेळाच्या पुढचा विचार करत असतो. मला असे वाटते की कर्णधार म्हणून हे खूप महत्वाचे आहे. विशेषतः ट्वेन्टी २० मध्ये. हेच त्याला महान कर्णधार बनवते.”
धोनीने आयपीएलच्या पहिल्या मोसमपासून चेन्नई संघाचे कर्णधापद स्वीकारले आहे. तसेच त्याने जरी मागील वर्षी आंतराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून कर्णधारपद सोडले असले तरी तो यावर्षीसुद्धा आयपीएलमध्ये चेन्नई संघाचे नेतृत्व करणार आहे.
त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स संघाने नेहमीच आयपीएलमध्ये उत्तम खेळ केला आहे. पण चेन्नईवर मागील दोन वर्षे सट्टेबाजी प्रकरणामुळे बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे धोनीला पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळावे लागले होते.
मात्र ही बंदी पूर्ण झाल्याने चेन्नईने यावर्षी आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे. चेन्नईने धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्या आठ मोसमांमध्ये २ वेळा विजेतेपद तर ४ वेळा उपविजेतेपद मिळवले आहे.
यावर्षीच्या आयपीएलची सलामीचीच लढत चेन्नई आणि मुंबई संघात होणार आहे. याबद्दल हरभजन म्हणाला, ” हे खूप मस्त आहे की तुम्ही दोन मजबूत संघाचे भाग असता. मुंबई इंडियन्स संघाबरोबरचे १० वर्षे खूप छान होते आणि आता मी दुसऱ्या चांगल्या संघाचा भाग असणार आहे. आपण सगळे मिळून चेन्नईसाठी चांगले खेळू.”
तो पुढे म्हणाला, “चेन्नई विरुद्ध मुंबई , दोन्ही अव्वल संघ असल्याने दबाव तर असणार. कितीही वाईट परिस्थिती असली तरी दोन्ही संघ शेवटपर्यंत लढतात आणि संधी तयार करतात. अशाच प्रकारे कोणताही चॅम्पियन संघ खेळत असतो. ते जिद्दीने आणि अभिमानाने खेळतात.”
सध्या हरभजनला मागील काही महिन्यांपासून भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. बऱ्याचदा याच कारणावरून त्याने धोनी कर्णधार असताना त्याच्यावर टीका केल्या आहेत.