भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग यावर्षी आयपीएलच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्यामुळे तो यावर्षी पिवळ्या जर्सीबरोबरच नव्या जर्सी क्रमांकातही चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
त्याच्या या खास जर्सी क्रमांकाबद्दल त्याने ट्विटरवरून माहिती दिली आहे. त्याने २७ या क्रमांकाच्या चेन्नई सुपर किंग्स जर्सीचा फोटो पोस्ट करताना लिहिले आहे की, ” २७.. माझ्यासाठी हा खूप खास क्रमांक आहे. नवीन क्रमांकाबरोबर नवीन प्रवास सुरु होत आहे.”
27.. yes a very special number for me ! ❤ new number new journey .. let the party begin! #whistlepodu pic.twitter.com/j1f4kbpFdw
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 22, 2018
हरभजनने आयपीएलच्या मागील १० मोसमात मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. पण यावर्षी आयपीएल लिलावात चेन्नई संघाने त्याला त्याच्या २ कोटी या मूळ किमतीत संघात सामील करून घेतले आहे. यानंतर हरभजननेही चेन्नई संघाकडून खेळण्यास उत्सुक असल्याचे त्याने म्हटले होते.
२७ जुलै २०१६ ला हरभजनला मुलगी झाली होती, त्याचमुळे त्याच्यासाठी २७ हा क्रमांक खास आहे. तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना ३ क्रमांकाची जर्सी घालून खेळत होता.
पण यावर्षी तो चेन्नईकडून खेळणार आहे आणि चेन्नई संघातील आक्रमक फलंदाज सुरेश रैनाच्याही जर्सीचा क्रमांक ३ असाच आहे. त्यामुळेच कदाचित हरभजनला त्याचा ३ हा पूर्वीचा जर्सी क्रमांक बदलावा लागल्याची शक्यता आहे.
हरभजन आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १३६ आयपीएल सामन्यांमध्ये १२७ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत लसिथ मलिंगा १५४ विकेट्ससह अव्वल क्रमांकावर तर अमित मिश्रा १३४ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.