इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली, पण असे असले तरी मुंबई इंडियन्सकडून या आयपीएल हंगामात पदार्पण केलेल्या तिलक वर्मा याने मात्र सुरुवातीपासूनच प्रभावित करणारी कामगिरी केली. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताच्या माजी क्रिकेटपटूनेही त्याचे कौतुक करताना तो भविष्यातील मुंबईचा कर्णधार असल्याचे सांगितले आहे.
गुरुवारी (१२ मे) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Chennai Super Kings vs Mumbai Indians) सामना झाला. या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात तिलक वर्माने (Tilak Varma) महत्त्वाचे योगदान दिले. चेन्नईने दिलेल्या ९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने पहिल्या ५ षटकातच ४ विकेट्स गमावल्या होत्या. असे असतानाही १९ वर्षीय तिलक वर्माने नाबाद ३४ धावा करून मुंबईला विजय मिळवून दिला.
या सामन्यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) समालोचन करताना भविष्यवाणी केली की, तिलक वर्मामध्ये क्षमता असून तो पुढील काही वर्षे मुंबई इंडियन्ससाठी खेळू शकतो. तसेच तो मुंबई इंडियन्सचे भविष्यात नेतृत्व करतानाही दिसू शकतो. हरभजनच्या या विधानाला माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानेही सहमती दर्शवली.
रोहितकडूनही तिलक वर्माचे कौतुक
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) चेन्नईविरुद्ध विजय मिळवल्यानंतर तिलक वर्माचे कौतुक केले होते. तो म्हणाला की, तिलक वर्मा लवकरच भारतीय संघासाठी खेळताना दिसू शकतो. त्याने कठिण परिस्थितीतही चांगले प्रदर्शन केले आहे. त्याच्याकडे चांगले तंत्र असून चांगले प्रदर्शन करण्याची भूक आहे.
तिलक वर्माचे शानदार प्रदर्शन
तिलक वर्मा मुंबईकडून आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १२ सामन्यांत ४०.८९ च्या सरासरीने ३६८ धावा केल्या आहेत. त्याच्याव्यतिरिक्त मुंबईच्या कोणत्याच फलंदाजाला ३५० धावांचा टप्पा आयपीएलच्या १५ व्या हंगामात अद्याप गाठता आलेला नाही. तिलक वर्माने २ अर्धशतकेही झळकावली आहेत.
त्याने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत ४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने २५५ धावा केल्या असून ३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच १६ अ दर्जाचे सामने खेळले असून ७८४ धावा केल्या आहेत आणि ५ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय हैदराबादकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या तिलक वर्माने २७ टी२० सामन्यांत ७४९ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
द्रविडच्या साधेपणाने पुन्हा जिंकली लाखो मने! बुक स्टोअरमधील फोटो होतोय तुफान व्हायरल
पॉवरप्लेमध्ये सीएसकेचा मुकेश चौधरी बनला ‘सुपर किंग’, ‘या’ विक्रमात शमीला पछाडले
मुंबईविरुद्धच्या पराभवानंतरही ‘या’ गोष्टीमुळे धोनी खुश; वाचा काय म्हणाला