बुधवारी (12 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात राजस्थानने 3 धावांनी विजय मिळवला. राजस्थानच्या विजयात सलामीवीर जोस बटलर याचे महत्त्वाचे योगदान राहिले. त्याने आक्रमक अर्धशतक पूर्ण करत राजस्थानच्या धावसंख्येचा पाया रचला. त्याने या हंगामात सुरुवात अगदी सातत्यपूर्ण केले असून, त्यामुळे राजस्थान संघदेखील विजयरथावर आरूढ आहे. त्याच्या याच कामगिरीनंतर भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने त्याचे तोंडभरून कौतुक केले.
मागील हंगामात जोस बटलर याने दमदार कामगिरी करत हंगामात सर्वाधिक धावा काढत पर्पल कॅप आपल्या नावे केली होती. तीच कामगिरी त्याने या हंगामात देखील सुरू ठेवली. हंगामातील पहिल्या सामन्यात त्याने अर्धशतक पूर्ण केले होते. दुसऱ्या सामन्यात त्याला अपयश आले. मात्र, त्यानंतर पुढील दोन सामन्यातही त्याने लय प्राप्त करत अर्धशतकी खेळ्या केल्या. त्याच्या नावे या हंगामात 4 सामन्यात 204 धावा केल्या आहेत. त्याच्या याच खेळानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग त्याचे कौतुक करू लागला. तो म्हणाला,
“जोस बटलरची स्तुती करण्यासाठी माझ्याकडे शब्द कमी आहेत. तो पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटचा सर्वोत्तम खेळाडू आहे. तो क्रिझचा पूर्ण वापर करतो. त्याचे तंत्र चांगले असून, वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज यांच्याविरुद्ध तो एकसारख्याच स्ट्राइक रेटने धावा करू शकतो. माझ्यासाठी तो सध्या टी20 क्रिकेटचा क्रमांक एकचा फलंदाज आहे.”
बटलर आयपीएल व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व करतो. त्याच्याच नेतृत्वात इंग्लंडने दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला.
(Harbhajan Singh Praised Jos Buttler As Number One T20 Batter In World Right Now)