यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. या लढतीत पाकिस्तान संघाने १० गडी राखून जोरदार विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघातील फलंदाजांना आणि गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. दरम्यान ३१ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाचा पुढील सामना न्यूझीलंड संघासोबत होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असावी याबाबत हरभजन सिंगने भाष्य केले आहे.
भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने इंडिया टूडेसोबत बोलताना म्हटले की, “मी कित्येक दिवसांपासून हेच म्हणत आहे की, आता ईशान किशनला खेळवण्याची वेळ आली आहे. त्याने रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करायला हवी. तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आणि केएल राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. त्यामुळे चौथ्या क्रमांकापर्यंत भारतीय संघाची फलंदाजी मजबूत होऊ शकते.” पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्मा ० तर केएल राहुल ३ धावा करत माघारी परतला होता.
तसेच तो पुढे म्हणाला की, “रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर आणि हार्दिक पंड्या जर फिट असेल तर तो सहाव्या क्रमांकावर खेळू शकतो. कारण तो सामना जिंकुन देणारा खेळाडू आहे. जर तो फिट नसेल तर सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर आणि रिषभ पंत सहाव्या क्रमांकावर खेळू शकतो. तर रवींद्र जडेजा सातव्या आणि शार्दुल ठाकूर आठव्या क्रमांकावर खेळू शकतात. शार्दुल गोलंदाजी करू शकतो, क्षेत्ररक्षण करू शकतो तसेच बऱ्यापैकी फलंदाजी देखील करू शकतो. नुकताच तो आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळवून आला आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास आणखी वाढला असेल. यानंतर मोहम्मद शमी,जसप्रीत बुमराह आणि वरूण चक्रवर्ती हे ३ पर्याय आहेत.”
हरभजन सिंगच्या मते आगामी सामन्यासाठी असा असायला हवा भारतीय संघ – रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या/ शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा,मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.