भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने त्याचा टी२० संघ निवडला आहे. त्याने या संघात त्याच्या आवडीच्या ११ खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले आहेत. यामध्ये त्याने वेस्ट इंडीज संघाच्या तब्बल चार खेळाडूंची निवड केली. तसेच, भारतीय संघाचे तीन खेळाडू त्याने या संघासाठी निवडले आहेत. त्याव्यतिरिक्त इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या संघांमधील प्रत्येती एका खेळाडूला हरभजनने त्याच्या संघात सामील केले आहे. विशेष म्हणजे त्याने भारतीय संघाचा मजी कर्णधार एमएस धोनीला या संघाच्या कर्णधाराच्या रूपात नियुक्त केले आहे.
हरभजन सिंग एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलत होता. यावेळी त्याने त्याचे आतापर्यंतचे सर्वोत्तम ११ टी२० खेळाडू सांगितले आहेत आणि त्यांना त्याच्या टी२० प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले आहे. भारतीय संघाचा रोहित शर्मा आणि वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल या दोघांना त्याने त्याच्या संघात सलामीवीर फलंदाजाच्या रूपात निवडले आहे. हरभजनच्या मते इंग्लंड संघाचा जोस बटलर एक विश्वासू खेळाडू आहे आणि तो मैदानावर एकदा सेट झाला तर संपूर्ण डाव सांभाळतो. त्याने तिसऱ्या क्रमांकासाठी जोस बटलरला निवडले.
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनलाही त्याच्या संघात सामील केले आहे. वॉटसन ऑस्ट्रेलियासाठी खेळताना सलामीवीराची भूमिका पार पाडत असायचा. मात्र, हरभजनने त्याला चौथ्या क्रमांकावर संधी दिली आहे. हरभजन आणि वॉटसन २०१८ मध्ये आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जमध्ये एकत्र खेळले होते. दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सला हरभजनने पाचव्या क्रमांकावर निवडले आहे. यानंतर त्याने सहाव्या क्रमांकासाठी आणि कर्णधाराची जबाबदारी पार पाडण्यासाठी एमएस धोनीला निवडले आहे.
याव्यतिरिक्त अष्टपैलूच्या रूपात त्याने वेस्ट इंडीजच्या कायरन पोलार्ड आणि ड्वेन ब्रावोला निवडले आहे. तसेच गोलंदाजाच्या रूपात सुनील नरीन, श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराहला संघात सामील केले आहे.
हरभजन सिंगने निवडलेली टी२० प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, ख्रिस गेल, जोस बटलर, शेन वॉटसन, एबी डिविलियर्स, एमएस धोनी (कर्णधार), ड्वेन ब्रावो, कायरन पोलार्ड, सुनील नरीन, लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह.






