भारतीय क्रिकेट संघातील युवा खेळाडू सध्या वरिष्ठांच्या खांद्याला खांदा मिळवत आपले स्थान पक्के करण्याच्या प्रयत्नात आहेत. युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या प्रदर्शनात होत असलेल्या जबरदस्त सुधारणांमुळे त्याला न्युझीलंड विरुद्धच्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा प्रबळ दावेदार समजले आहे.
दुसरीकडे सिराजमुळे 303 कसोटी विकेट्स घेणाऱ्या अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माचे स्थान धोक्यात आल्याचे दिसत आहे. आता माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग यानेही सिराजला पसंती दर्शवली आहे.
अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आपल्या आवडत्या संघ समतोलाबाबत बोलताना हरभजनने सांगितले की, “अंतिम 11 खेळाडूंमध्ये इशांत शर्माच्या जागी सिराजला खेळवले पाहिजे. मी जर कर्णधार असतो तर मी 3 वेगवान गोलंदाजांना सोबत घेऊन मैदानावर उतरलो असतो. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांना अंतिम अकरा जणांमध्ये जागा मिळणे निश्चित आहे. परंतु या अंतिम सामन्यासाठी मी इशांतऐवजी मोहम्मद सिराजला पसंती देईन. इशांत शानदार गोलंदाज आहे. परंतु या सामन्यासाठी मी सिराजला निवडले. कारण गेल्या 2 वर्षांत त्याने आपल्या कामगिरीत जबरदस्त सुधारणा केली आहे.”
सिराजचे वर्तमान प्रदर्शन जबरदस्त
हरभजनला वाटते की, खेळाडूच्या वर्तमान प्रदर्शनाकडे नेहमी लक्ष दिले पाहिजे आणि त्यादृष्टीने विचार केल्यास सिराजने ब्रिस्बेन कसोटीत 5 बळी घेऊन भारताच्या मालिका विजयात मोलाची भूमिका वठवली होती.
या फिरकीपटूने सांगितले की, “तुम्ही वर्तमान प्रदर्शन बघितले पाहिजे. सिराजचे प्रदर्शन, वेग आणि आत्मविश्वास या गोष्टींमुळे तो अंतिम सामन्यासाठी एक चांगला गोलंदाज ठरेल. मागील सहा महिन्यांतील त्याचे प्रदर्शन बघितल्यास तो असा गोलंदाज आहे, जो संधीच्या शोधात असतो. इशांत काही काळ दुखापतींनी बेजार होता. परंतु त्यानेदेखील भारतीय क्रिकेटसाठी शानदार कामगिरी केली आहे.”
या कारणामुळे सिराज ठरेल घातक
हरभजनने सांगितले की, “जर खेळपट्टीवर गवत असेल तर मोहम्मद सिराज घातक ठरू शकतो. विश्वास ठेवा, न्युझीलंडच्या फलंदाजांना त्याला खेळणे अवघड जाईल कारण तो गतीने चेंडूला ‘ऑफ द पिच’ वळवतो.”
शुभमन गिलला प्रदर्शनात सुधार करण्याची गरज
याबरोबरच युवा सलीमीवीर शुबमन गिलविषयी हरभजनने सांगितले की, “मला विश्वास आहे की पंजाबचा या प्रतिभावान फलंदाजाने निश्चितच आपल्या कमजोर बाजूंवर काम केले असेल. अपेक्षा आहे की तो इंग्लंडमध्ये शानदार कामगिरी करेल. पहिल्या डावात 375 ते 400 धावा भारतीय वेगवान आक्रमनासाठी चांगल्या ठरतील. परंतु त्यासाठी गिलला चांगली फलंदाजी करावी लागेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
इशान आणि पंत यांच्यातील ‘मॅचविनर’ कोण? आकडेवारीचं झुकतं माप ‘या’ खेळाडूच्या बाजूने
‘ही’ परदेशी टी२० स्पर्धा गाजवण्यास भारतीय महिला क्रिकेटपटू सज्ज, स्म्रीतीचाही समावेश