इंडियन प्रीमियर लीगच्या येत्या १४व्या हंगामाचा लिलाव पुढील महिन्यात होणार आहे. या लिलावापुर्वी अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग याचा चेन्नई सुपर किंग्स संघासोबतचा प्रवास संपला आहे. स्वत: हरभजनने बुधवारी (२० जानेवारी) सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. हरभजन मागील २ सत्रांपासून चेन्नई संघाचा भाग राहिला आहे. परंतु त्याने संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या आयपीएल २०२०मधून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली होती.
चेन्नई संघाची साथ सोडत असल्याचे सांगत हरभजनने लिहिले की, ‘चेन्नई सुपर किंग्स संघासोबतचा माझा करार संपला आहे. या संघासोबत खेळण्याचा अनुभव खूप अप्रतिम राहिला.. बऱ्याच अविस्मरणीय आठवणी मी इथे बनवल्या आणि काही चांगले मित्रही इथे मला मिळाले, ज्यांना मी लवकर विसरू शकणार नाही.. चेन्नई संघाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे, संघ व्यवस्थापनाचे आणि चाहत्यांचे आभार.’
As my contract comes to an end with @ChennaiIPL, playing for this team was a great experience..beautiful memories made &some great friends which I will remember fondly for years to come..Thank you @ChennaiIPL, management, staff and fans for a wonderful 2years.. All the best..🙏
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) January 20, 2021
दोन वर्षे केले चेन्नईचे प्रतिनिधित्त्व
आयपीएल २००८मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून हरभजनने आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर आयपीएल २०१८ लिलावात चेन्नई संघाने २ कोटी रुपयांत हरभजनला आपल्या संघात सहभागी केले होते. २०१८ मध्ये चेन्नईकडून खेळताना त्याने १३ सामन्यात ७ विकेट्स घेतल्या होत्या. तर २०१९ मध्ये ११ सामन्यात १६ विकेट्सची कामगिरी केली होती.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज
हरभजनच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर, त्याने एकूण १६० सामने खेळले आहेत. दरम्यान २६.४४च्या सरासरीने १५० विकेट्स घेतल्या आहेत. यासह हरभजन हा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा सर्वाधिक १७० विकेट्ससह अव्वलस्थानी विराजमान आहे. तर अमित मिश्रा (१६० विकेट्स) आणि पियूष चावला (१५६ विकेट्स) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. याबरोबरच ड्वेन ब्रावो १५३ विकेट्सह चौथ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वंदे मातरम! ब्रिस्बेन कसोटी विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ फॅनचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
“शब्दात भावना व्यक्तच होऊ शकत नाही” टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार रहाणे खुष