श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आलं आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात हार्दिक पांड्या भारताचा उपकर्णधार होता. त्यामुळे रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर तोच संघाचा कर्णधार बनेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र हार्दिककडून उपकर्णधार पदही काढून घेण्यात आलंय. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यानं हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ मोठं वक्तव्य केलंय.
‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेशी बोलताना कैफ म्हणाला की, अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीनं हार्दिकला टी20 संघाच्या कर्णधारपदाचा पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन पाठिंबा द्यायला हवा होता. कैफ म्हणाला, “हार्दिकनं 2 वर्ष गुजरात टायटन्सचं कर्णधारपद सांभाळलं आहे. त्यानं गुजरातसाठी पहिल्याच वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकली. हार्दिकला टी20 संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. टी20 विश्वचषकातही तो उपकर्णधार होता.”
हार्दिकबाबत बोलताना कैफनं हेड कोच गौतम गंभीरचाही उल्लेख केला. कैफ म्हणाला, “आता नवा कोच आला आहे, नवीन योजना असेल. सूर्याही चांगला खेळाडू आहे, तो वर्षानुवर्षे खेळत आहे. तो नंबर 1 टी20 खेळाडू आहे. मला आशा आहे की तो कर्णधाराची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडेल. पण मला वाटतं की हार्दिकला पाठिंबा द्यायला हवा होता. गंभीर एक अनुभवी कर्णधार आणि प्रशिक्षक आहे. त्याला क्रिकेट चांगलं समजतं. परंतु मला वाटतं, हार्दिकनं कर्णधारपद मिळू नये, असं काहीच चुकीचं केलेलं नाही”.
हार्दिक पांड्यानं आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचं नेतृत्व केलं आहे. आता तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. याशिवाय त्यानं तीन एकदिवसीय आणि 16 टी20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. कैफ म्हणाला, “हार्दिककडे कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. त्यानं आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवलं आहे. नवीन आणि तरुण चेहऱ्यांसह नवीन संघाचं (गुजरात टायटन्स) नेतृत्व करणे ही मोठी गोष्ट आहे. आयपीएलमध्ये टायटन्सला विजयापर्यंत नेण्यासाठी त्यानं शून्यापासून काम केलं होतं. मला वाटतं की त्याला कर्णधारपद मिळायला हवं होतं.”
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचाही धक्का, सूर्यकुमार टी20चा कर्णधार बनताच केलं सूचक ट्विट!
जिथे-तिथे फक्त किंग कोहलीचीच हवा! ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत सर्व सेलिब्रेटींना टाकलं मागे
हार्दिक पांड्याला घटस्फोटानंतर नताशाला द्यावा लागणार संपत्तीतील 70% वाटा?