भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने भारताचे महान कर्णधार कपिल देव यांच्या ३४ वर्षे जुन्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. हार्दिकने एका वर्षात वनडेत २५ पेक्षा जास्त बळी आणि ५०० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे.
असा विक्रम ३४ वर्षांपूर्वी १९८३ साली भारताचे पहिले विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनी केला होता. त्यांनी १९८३ साली १८ वनडे सामन्यात २५ बळी आणि ३७.६४ च्या सरासरीने ५२७ धावा केल्या होत्या.
हार्दिकने २०१७ या वर्षात वनडेत २९ सामन्यात १९ डावात खेळताना १२०.५६ च्या सरासरीने ५५७ धावा केल्या आहेत. यात त्याने ४ अर्धशतकेही केली आहेत. गोलंदाजी करताना त्याने २७ डावात ३५.५१ च्या सरासरीने ३१ बळी मिळवले आहेत.
हार्दिकने मागील वर्षी न्यूझीलंड विरुद्ध १६ ऑक्टोबर २०१६ ला वनडेत पदार्पण केले होते. त्याच्यारुपात भारताला एक चांगला अष्टपैलू खेळाडू मिळाला असल्याचे मते अनेकांनी मांडले होते. तसेच हार्दिक भारताचा पुढचा कपिल देव असल्याचेही म्हटले गेले होते. हा विक्रम करून त्याने ते काही प्रमाणात सिद्ध केले आहे.