भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रविवारी (२४ ऑक्टोबर) टी-२० विश्वचषक स्पर्धेत रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघातील फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि भारतीय संघावर १० गडी राखून जोरदार विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघासाठी आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्यानंतर त्याने आयपीएल स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले होते. परंतु तो गोलंदाजी करताना दिसून आला नव्हता. टी-२० विश्वचषक स्पर्धेत देखील तो गोलंदाजी करताना दिसून येणार नाहीये. त्याला फलंदाज म्हणून या संघात स्थान देण्यात आले आहे.
दरम्यान रविवारी (२४ ऑक्टोबर) पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील त्याला फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. या सामन्यात तो ८ चेंडूंमध्ये ११ धावा करत माघारी परतला होता. त्यानंतर त्याचा उजवा खांदा दुखापतग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले होते, ज्यामुळे तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी देखील मैदानावर आला नव्हता. त्याच्या ऐवजी ईशान किशन मैदानावर आला होता. हा सामना झाल्यानंतर त्याला त्वरित स्कॅनसाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. त्यामुळे ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पाकिस्तान संघाविरुद्ध झालेला सामना हा हार्दिक पंड्यासाठी देखील खूप महत्वाचा होता. कारण हा त्याच्या टी -२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५० वा सामना होता. नाणेफेक झाल्यानंतर त्याने म्हटले होते की, “मला पाठ दुखीचा त्रास होत होता. परंतु मी आता ठीक आहे. मी आता तर गोलंदाजी करू शकत नाहीये. परंतु नॉकआऊट सामन्यांमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल.” भारतीय संघाचा पुढील सामना ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड संघाविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रिजवानने उत्कृष्ट फलंदाजी तर केलीच, पण ‘या’ गोष्टीने लाखो चाहत्यांची हृदयही जिंकली; व्हिडिओ व्हायरल
होय, हेच ते खलनायक! युवांबरोबर ‘हे’ ५ अनुभवी भारतीय खेळाडू पाकिस्तानपुढे गारद, पराभवास ठरले जबाबदार