२०२० आयपीएलनंतर भारतीय संघाने लगेचच ऑस्ट्रेलियाचा दौरा केलेला. आधी मर्यादित षटकांच्या मालिका आणि त्यानंतर कसोटी मालिका असा हा कार्यक्रम होता. मर्यादित षटकांची मालिका गाजवली दोन नावांनी. गोलंदाजीमध्ये होता पहिल्यांदाच खेळत असलेला टी नटराजन आणि फलंदाजीमध्ये हार्दिक पंड्या. टिपिकल हार्ड हिटिंग काय असते हे हार्दिकने बऱ्याच काळानंतर दाखवून दिलेले. तिथून पुढे हार्दिकचा फॉर्म गंडला आणि दुखापतींनी देखील त्याला घेरले. हार्दिक कधी खेळायचा तर कधी नाही.
चार महिन्यात पुन्हा आयपीएल आली. हार्दिकचा फॉर्म जैसे थे. फक्त फलंदाज म्हणून मुंबई त्याला संधी देत राहिली. अशात कोरोनाने डोके वर काढले आणि आयपीएल पुढे ढकलावी लागली. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयपीएलचा उत्तरार्ध युएईत झाला आणि हार्दिक त्या खराब फॉर्ममधून काही उजरला नाही. म्हणतात ना, क्रिकेटमध्ये आकडेवारीची भाषा बोलते, तसे आयपीएल २०२१ मध्ये हार्दिकने १२ सामन्यांमध्ये १२७ धावा केल्या आणि त्यावर आणखी एक कडी म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी एकही षटक त्याने टाकली नाही. अशी त्याच्या खराब प्रदर्शनाची परिसीमा. या आयपीएलनंतर लगेचच टी२० विश्वचषक होणार होता. हार्दिकची आधीच विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेली.
मात्र, चाहत्यांनी त्याच्या निवडीवर जोरदार आक्षेप घेतला. आधीच अष्टपैलू म्हणत असलेला हार्दिक गोलंदाजी करत नाही आणि फलंदाज म्हणून खेळायच म्हटलं तर त्याचा फॉर्मही नाही. याच साऱ्या घटना घडत होत्या. भारतीय संघासाठी आणि भारतीय संघाच्या चाहत्यांसाठी हा विश्वचषक विसरण्यासारखा राहिला. फेवरेट म्हणून सहभागी होत असलेल्या भारतीय संघाला पहिल्याच सामन्यामध्ये पाकिस्तानने पटखणी दिली. न्यूझीलंडनेही भारतीय संघाविरूद्धचा आपला रेकॉर्ड अबाधित राखला. शेवटी भारतीय संघावर ग्रुप स्टेजमध्येच विश्वचषकातून बाहेर व्हायची नामुष्की आली.
त्यानंतर मात्र हार्दिकने एक मोठा निर्णय घेतला. त्याने सरळ बीसीसीआयला सांगून टाकले की, आता मी काही काळ भारतीय संघासाठी खेळायला उपलब्ध नसेल. फिटनेस आणि फॉर्म यातून सावरण्यासाठी हार्दिकने हा निर्णय घेतलेला. आपण घेतलेला डिसिजन खरा करुन दाखवण्याचे सर्वात मोठे आव्हान हार्दिक पुढे होते.
हार्दिक फक्त सोशल मीडियावर दिसायचा. कधी कुटुंबासोबत वेळ घालवताना तर कधी वर्कआऊट करताना. एनसीएमधून बातम्या यायच्या की, हार्दिक फिट होतोय. मधेच असही कळायचं की पुन्हा दुखापत झाली. काय खरं काय खोटं याचा पत्ता लागत नव्हता. अशात आयपीएल २०२२ साठी रिटेन्शन करण्याची वेळ आली. २०१५ पासून मुंबई इंडियन्सचा मजबूत खांब असलेला हार्दिक, यावर्षी मुंबईसाठी खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होते. कारण, एकतर त्याच्या गुजरात राज्याची नवी फ्रॅंचाईजी आली होती आणि दुसरे म्हणजे, एका संघाला फक्त तीन भारतीय क्रिकेटर्सना रिटेन करता येणार होते. मुंबईने कॅप्टन रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादवची निवड केली.
ज्याच्या क्रिकेट करियरवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं, अशा हार्दिकवर साडेपाच हजार कोटींच्या अहमदाबाद फ्रॅंचाईजीने विश्वास दाखवला. नंबर वन ड्राफ्ट प्लेयर म्हणून हार्दिकची निवड केली. त्यातही आणखी विशेष म्हणजे साध्या क्लब क्रिकेटमध्येही कधी कॅप्टन्सी न केलेल्या हार्दिककडे त्यांनी सरळ नेतृत्वाची धुरा दिली.
मेगा ऑक्शनमध्ये मॅनेजमेंटने गुजरात टायटन्स या नावाने एक ठीकठाक संघ हार्दिकला दिला. अनेक क्रिकेट पंडितांनी म्हटले, यांचे हे पहिलेच वर्ष. त्यात हार्दिकसारखा इतर गोष्टीत रमणारा खेळाडू कर्णधार. हे दहाव्याच नंबरला राहणार. पण म्हणतात ना, खोटे सिक्के चालतात म्हणजे चालतातच. अगदी तसंच झालं. पहिल्यापासून गुजरातची गाडी सुसाट धावली. इतकी सुसाट की, आधी लीग स्टेज टॉप केलेल्या गुजरातने, सरळ ट्रॉफीच घरी नेली. साऱ्या संघासोबतच हार्दिकच अमाप कौतुक झालं. मात्र, यापूर्वी कधीही कॅप्टन नसलेल्या हार्दिकने काय केलं हे जास्त इंटरेस्टिंग आहे.
ज्या मस्तमौला एटीट्यूडसाठी हार्दिक ओळखला जातो, तोच एटीट्यूड त्याने संघात आणला. ना जास्त टीम मीटिंग, ना जास्त एनालिसिस… आपल्याला जेवढे येतं तेवढं खेळायचं, असा साधा कानमंत्र दिला. त्याच्या जोडीला मेंटर आशिष नेहराही तसाच. खा, प्या, मस्त झोपा आणि जबरदस्त खेळून मॅच जिंकून या, एवढच त्याने सांगितलेल. सर्वांनी हा मंत्र फॉलो केला. जिथं संघ अडचणीत पडला तिथे स्वतः हार्दिक उभा राहिला. फलंदाज म्हणून त्याचा हा सर्वोत्तम हंगाम राहिला. कित्तेक सामन्यांमध्ये चार-चार षटकांचे स्पेलही त्याने टाकले. क्षेत्ररक्षण तर लाजवाबच. धोनी आणि रोहितच्या तालमीत तयार झालेल्या हार्दिकने ‘कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट’ हा वाक्प्रचार सत्यात उतरवून दाखवला. तोही असा की, पहिल्याच प्रयत्नात ट्रॉफी घरी घेऊन जात.
अगदी सहा महिन्यापूर्वी टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद होत आहेत, असं म्हटलं जाऊ लागलेल. तो हार्दिक पंड्या आज आयपीएल विनिंग कॅप्टन आहे. इतकंच काय, त्याच हार्दिकच नाव आता, भारतीय संघाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार म्हणून घ्यायला सुरुवात झालीये. एकूणच हार्दिकची आता पाचही बोटे तुपात आहेत.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईच्या खराब कामगिरीवर हळहळला पोलार्ड, भावूक पोस्ट लिहीत म्हणाला, ‘नुकसानीचा अंदाज लावणे कठीण’
पाच खेळाडूंच्या जीवावर गुजरात टायटन्स झाली IPL 2022 विजयाची शिल्पकार, पाहा कोण आहेत ते?
द्विपक्षीय टी२० मालिका बंद करा, म्हणजे एका वर्षात २ वेळा आयपीएल होईल; पाहा कोणी केलंय विधान