क्रिकेट सामन्यादरम्यान कधी-कधी खेळाडूंचा त्यांच्यावरील संयम सुटतो आणि ते आपल्या संघ सहकाऱ्यावर किंवा विरोधी संघातील खेळाडूंवर राग काढताना दिसतात. असेच काहीसे गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यादरम्यान घडले होते. शुक्रवारी (०८ एप्रिल) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना झाला होता. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्त्वाखालील गुजरातने हा सामना ६ विकेट्स राखून जिंकला. मात्र सामन्यादरम्यान हार्दिकचा त्याचाच संघ सहकारी डेविड मिलर याच्यावर पारा चढला होता.
त्याचे झाले असे की, पंजाबच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शुबमन गिलने संघाला दमदार सुरुवात करून दिली होती. ९६ धावांची कडकडीत खेळी करत त्याने संघाला विजयाच्या जवळ नेले होते. मात्र १९व्या षटकादरम्यान तो झेलबाद झाला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्यावर (Hardik Pandya) संघाला विजयी शेवट करून देण्याची जबाबदारी होती.
हार्दिकनेही १८ चेंडूंमध्ये १५०च्या स्ट्राईक रेटने २७ धावा फटकावल्या. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकारही मारले. मात्र विसाव्या षटकात तो धावबाद झाल्यामुळे सामना पलटू शकत होता. पंजाबकडून ओडियन स्मिथ शेवटचे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील पहिल्या चेंडूवर गुजरातचा डेविड मिलर स्ट्राईकवर होता. त्याने या चेंडूवर साधारण फटका मारला आणि तो १ धाव घेण्यासाठी धावला.
दुसरीकडे नॉन स्ट्राईकवर असलेला हार्दिकही ती धाव पूर्ण करण्यासाठी पळाला होता. परंतु इतक्याच यष्टीरक्षक जॉनी बेयरस्टोने चेंडू पकडला तो अलगद स्ट्राईकवरील यष्ट्यांना मारला. तोपर्यंत हार्दिक त्याची धाव पूर्ण शकला नव्हता. परिणामी तो धावबाद झाला. निर्णायक षटकात धावबाद झाल्यामुळे हार्दिक वैतागला आणि तो मिलरकडे (David Miller) पाहात त्याच्यावर रागाने (Hardik Pandya Angry On David Miller) ओरडताना दिसला. मिलरने मात्र त्यावर कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
— Sam (@sam1998011) April 8, 2022
भलेही हार्दिक या महत्त्वपूर्ण षटकात बाद झाला असला. तरीही संघाला विजय मिळवून देण्याचे काम राहुल तेवतियाने केले. त्याने शेवटच्या षटकात फलंदाजीला येत २ खणखणीत षटकार मारत संघाला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. गुजरातचा हा हंगामातील सलग तिसरा विजय होता.