भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने २०१६सालच्या टी२० विश्वचषकातील त्या ऐतिहासिक सामन्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ज्यामध्ये भारताने बांग्लादेशला सुपर १०च्या अंतिम टप्प्याच्या जवळ पोहोचल्यानंतर पराभूत केले होते.
बेंगळुरु येथे झालेल्या त्या सामन्यात पंड्याने शेवटच्या षटकातील शेवटच्या ३ चेंडूंवर सलग ३ फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या होत्या. त्यामध्ये २ फलंदाज झेलबाद झाले होते. तर, शेवटचा १ फलंदाज धावबाद झाला होता आणि त्या विकेटसाठी भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीची नेहमी आठवण काढली जाते.
भारतीय संघाचा गोलंदाज आशिष नेहरासोबत संवाद साधताना पंड्याने त्या सामन्याची आठवण काढत कर्णधार धोनीच्या रणनितीचा उल्लेख केला. त्या सामन्यात बांग्लादेशला शेवटच्या षटकात विजयासाठी ११ धावांची आवश्यकता होती. फलंदाजी करत असणाऱ्या महमूदुल्लाहने पहिल्या चेंडूवर एक धाव घेत मुश्फिकुर रहीमला स्ट्राईक दिली. रहीमने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग २ चौकार मारले होते आणि सामन्याला अतिशय निर्णायक स्थितीत आणले होते.
शेवटच्या ३ चेंडूत फक्त २ धावांची गरज होती. परंतु, गोलंदाजी करत असणाऱ्या पंड्याच्या चौथ्या चेंडूवर शिखर धवनने रहीमचा आणि ५व्या चेंडूवर रविंद्र जडेजाने महमूदुल्लाहला झेल पकडत त्यांना बाद केले. तर, शेवटच्या चेंडूवर धोनीने मुस्तफिजुर रेहमानला धावबाद करत फक्त एका धावेने तो सामना जिंकला.
याविषयी बोलताना पंड्या म्हणाला की, “जर त्या वेळेला मी फलंदाजी करत असतो. तर मी एक धाव घेतली असती आणि पुढे माझा सिग्नेचर शॉट खेळला असता. परंतु, त्यावेळी माझ्या डोक्यात शेवटच्या एका धावेसाठी कोणता चेंडू खेळणे अवघड जाईल याचा विचार चालू होता. मला वाटले, बॅक ऑफ द लेंथ चेंडूवर खेळणे फलंदाजाला अवघड जाईल आणि जरी फलंदाजाने १ धाव घेतली असती तरी त्याला खूप कठीण गेले असते. पण ते दोन्ही फलंदाज मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात बाद झाले. शेवटी मी यॉर्कर टाकला आणि तो फुलटॉस गेला.”
पंड्या पुढे बोलताना म्हणाला, “मला पूर्णपणे आठवण आहे. काहीजण मला बाउंसर टाक म्हणत होते. पण, माही भाई आणि आशू भाईनी मला म्हटले, खालच्या फळीतील फलंदाज आहे. जर त्याने हवेत बॅट फिरवली आणि किनाऱ्यावर चेंडू लागला. तर नक्कीच चौकार जाईल. म्हणून तू ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाक.”
#IND captain @msdhoni reveals what he said to @hardikpandya7 before the final ball in #INDvBAN #WT20 #AskCaptain pic.twitter.com/qpZK2NuClc
— ICC (@ICC) March 24, 2016
“मी चेंडू थोडासा बाहेर टाकला आणि थक्क राहिलो. स्ट्राईकवर असणाऱ्या शुवगता होमला तो चेंडू खेळता आला नाही आणि चेंडू यष्टीमागील धोनीकडे गेला. धोनीने वेगाने पळत चेंडूला यष्टीवर मारले. पंचांनी त्यांचा निर्णय तिसऱ्या पंचाकडे सोपवला आणि त्यांनी रहीमला बाद असल्याचे घोषीत केले. अशाप्रकारे भारताने तो सामना जिंकला होता,” असे पंड्या म्हणाला.