कोलकाता । भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेपैकी पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. यापूर्वी घोषित झालेल्या १६ खेळाडूंच्या संघात हार्दिकचा समावेश होता.
हार्दिक पंड्या गेले काही महिने मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळला असल्याकारणाने त्याला विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघाच्या १६ खेळाडूंची पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी २३ ऑक्टोबर रोजी घोषणा करण्यात आली होती. त्यात १६ खेळाडूंना स्थान देण्यात आले होते. त्यात तेव्हा हार्दिक पंड्याचा समावेश होता.
परंतु आज बीसीसीआयच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की पंड्या यापुढे काही दिवस बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करणार आहे.
याबरोबर सिनियर निवड समितीने संजू सॅम्सनला श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यासाठी अध्यक्षीय सामन्याचा कर्णधार केले आहे. नमन ओझा यापूवीच दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याजागी अमरदीप सिंग या खेळाडूला संधी देण्यात आली आहे.
असा आहे भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), केएल राहुल, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, वृद्धिमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा.
भारत अध्यक्षीय संघ: संजू सॅम्सन (कर्णधार), जीवनजोत सिंग, बी संदीप, तन्मय अगरवाल, अभिषेक गुप्ता, रोहन प्रेम, आकाश भंडारी, जलज सक्सेना,चामा मिलिंद, आवेश खान,संदीप वॉरियर, रवी किरण, अनमोलप्रीत सिंग.