भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. मोठ मोठे षटकार मारणारा हार्दिक पंड्या साजेशी कामगिरी न केल्याने टीकाकारांच्या निशाण्यावर आला होता. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात त्याला एकही मोठी खेळी करता आली नव्हती. पण मंगळवारी (२८ सप्टेंबर) पंजाब किंग्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तुफानी खेळी करत त्याने जोरदार पुनरागमन केले आहे आणि मुंबई इंडियन्स संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला. या विजयानंतर त्याने या अप्रतिम खेळीचे श्रेय विरोधी संघातील गोलंदाजाला दिले आहे.
हार्दिक पंड्याने या सामन्यात धावांचा पाठलाग करताना १३३.३३ च्या स्ट्राइक रेटने नाबाद ४० धावांची खेळी केली. या खेळीनंतर हार्दिक पंड्याने आयपीएल टी -२० डॉट कॉम वर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, “खरं सांगायचं झालं तर, मी याचे श्रेय मोहम्मद शमीला देतो. कारण जो चेंडू मला लागला त्या चेंडूने मला जाग आली आणि त्या चेंडूनंतर जणू सर्वच काही बदलून गेलं. यापूर्वी मला हे सर्व खूप कठीण वाटत होतं. प्रत्येक खेळ, प्रत्येक प्रसंग ही एक नवीन संधी आहे.” हार्दिक पंड्या फलंदाजी करत असताना मोहम्मद शमीचा एक बाऊन्सर चेंडू हार्दिक पंड्याच्या हेल्मेटला जाऊन धडकला होता.
तसेच तो पुढे म्हणाला की, “तुम्ही नायक बनू शकता आणि आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकता. मी विसरून जातो की, भूतकाळात काय घडलं आहे आणि प्रत्येक सामन्यात १०० टक्के देण्याचा प्रयत्न करत असतो.”
हार्दिक पंड्याने या सामन्यात महत्वपूर्ण खेळी केली होती. परंतु २ गडी बाद करणाऱ्या आणि ७ चेंडुंमध्ये नाबाद १५ धावांची खेळी करणाऱ्या पोलार्डला या सामन्यात सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स संघाचा पुढील सामना २ ऑक्टोबर रोजी दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध होणार आहे.
मुंबई इंडियन्स संघाचा ६ गडी राखून विजय
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाब किंग्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना एडेन मार्करमने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली होती. तर दीपक हुड्डाने २८ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्स संघाला ६ षटक अखेर १३५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना सौरभ तिवारीने सर्वाधिक ४५ धावांचे योगदान दिले होते. तर हार्दिक पंड्याने तुफान फटकेबाजी करत नाबाद ४० धावांचे योगदान दिले आणि मुंबई इंडियन्स संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयने आयपीएल २०२१च्या वेळापत्रकात बदल करण्यामागे आहे ‘रहाणे कनेक्शन’?, घ्या जाणून
दिल्लीच्या पराभवाने विजयी मुंबईला धक्का, टॉप-४ मध्ये उडी घेण्याची हुकली संधी; पाहा अपडेटेड गुणतालिका
अरर! स्वतःचीच यष्टी उखडून फलंदाज विचित्र पद्धतीने बाद, व्हिडिओ बघून व्हाल लोटपोट