क्रिकेटमधील लोकप्रिय समाजल्या जाणाऱ्या इंडियम प्रीमीयर लीगच्या १५ व्या हंगामाला सुरुवात झाली असून या हंगामात १० संघ खेळताना दिसून येत आहेत. आयपीएल २०२२ हंगामापासून गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन नवे संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. दरम्यान या दोन संघात सोमवारी (२८ मार्च) हंगामातील चौथा आणि त्यांचा स्पर्धेतील पहिलाच सामना पार पडला. या सामन्या पंड्या विरुद्ध पंड्या असा एक वेगळा संघर्षही पाहायला मिळाला. यावर हार्दिक पंड्या याने प्रतिक्रिया दिली आहे.
पंड्या बंधू वेगवेगळ्या संघात
गेल्यावर्षीपर्यंत हार्दिक (Hardik Pandya) आणि कृणाल (Krunal Pandya) हे पंड्या बंधू मुंबई इंडियन्सनकडून आयपीएलमध्ये एकत्र खेळत होते. पण आयपीएल २०२२ हंगामापूर्वी (IPL 2022) या दोघांनाही मुंबईने मुक्त केले. त्यामुळे आयपीएलमधील या दोघांचे मार्ग वेगळे झाले. हार्दिकला गुजरातने लिलावापूर्वी १५ कोटींची किंमत मोजत आपल्या संघात घेत कर्णधार केले, तर कृणालला लिलावात लखनऊने ८ कोटींहून अधिकची रक्कम देत आपल्या संघात घेतले. त्यामुळे सोमवारी हे दोघे भाऊ आमने-सामने होते.
तसेच सोमवारी झालेल्या सामन्यात जेष्ठ बंधू कृणालने धाकटा भाऊ हार्दिकला ३३ धावांवर बाद देखील केले. कृणालच्या गोलंजादीवर हार्दिकचा झेल मनिष पांडेने घेतला. मात्र, असे असले तरी हा सामना हार्दिक कर्णधार असलेल्या गुजरात टायटन्सने जिंकला.
कुटुंबात समतोल वातावरण
या सामन्यानंतर हार्दिकला विचारण्यात आले की, कृणालने विकेट घेतल्यानंतर काय भावना होत्या. त्यावर हार्दिक म्हणाला, ‘जर आम्ही सामना पराभूत झालो असतो, तर मला कृणालच्या गोलंदाजीवर बाद होण्याचं जास्त वाईट वाटलं असतं. त्यामुळे आमच्या कुटुंबात याबद्दल समतोल भावना आहेत की, त्याने मला बाद केले आणि मी सामना जिंकला.’
या सामन्यात कृणाल आणि हार्दिक या दोघांनीही आपापल्या संघांसाठी अष्टपैलू कामगिरी केली. कृणालने गोलंदाजीत एक विकेट घेतली, तर फलंदाजीत १३ चेंडूत २१ धावा केल्या. तसेच हार्दिकने चार षटके गोलंदाजी करताना ३७ धावा केल्या. तसेच फलंदाजीत त्याने ३३ धावा केल्या.
"The family is neutral and happy," @hardikpandya7 on the mini battle between the Pandya brothers 😀😀#TATAIPL #GTvLSG pic.twitter.com/FlspapmnRK
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2022
गुजराजने जिंकला सामना
या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १५८ धावा केल्या होत्या आणि गुजरातला १५९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग गुजरातने १९.४ षटकात ५ बाद १६१ धावा करत पूर्ण केला आणि सामना ५ विकेट्सने जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL2022| हैदराबाद वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
आजचा सामना: केव्हा आणि कसा पाहाल हैदराबाद वि. राजस्थान सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
जेव्हा पहिला भारतीय त्रिशतकवीर होण्याची भविष्यवाणी सेहवागने ३ वर्ष आधीच केली होती…