इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार व अष्टपैलू बेन स्टोक्स याने नुकतीच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अति क्रिकेटमुळे आपण तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळू शकणार नाही असे कारण देत, त्याने वनडे क्रिकेट सोडले. त्याच्या या निर्णयाची सध्या क्रिकेटजगतात चर्चा आहे. त्याचवेळी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीदेखील भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याविषयी महत्वाचे विधान केले आहे.
काय म्हणाले शास्त्री?
रवी शास्त्री हे सध्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेत समालोचन करत आहेत. त्यावेळी खेळाडूंच्या अकाली निवृत्ती या गोष्टीवर चर्चा सुरू होती. त्यावर बोलताना शास्त्री यांनी हार्दिक पंड्या याचे उदाहरण दिले. पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकानंतर हार्दिक वनडे क्रिकेटला रामराम ठोकू शकतो असे शास्त्री यांनी म्हटले. शास्त्री म्हणाले,
“पुढील वर्षी भारतातच वनडे विश्वचषक होणार आहे. त्यामुळे हार्दिक संघाचा प्रमुख खेळाडू असणार आहे. मात्र, त्यानंतर तो वनडे क्रिकेटमधून स्वतःला बाजूला करू शकतो. तुम्ही इतरही अशा अनेक खेळाडूंना असे निर्णय घेताना पाहू शकतो. आता बरेच खेळाडू क्रिकेटचा एकएक प्रकार निवडायला सुरुवात करतील.”
दुखापतींनी बेजार होता हार्दिक
गेल्या ३-४ वर्षांपासून दुखापतीमुळे अडचणीत असलेला हार्दिक पंड्या फारसे क्रिकेट खेळलेला नाही. २०१८ पर्यंत तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळत होता. मात्र, तेव्हापासून तो फक्त वनडे आणि टी२० खेळतोय. यामध्येही तो गेल्या काही महिन्यांत अधिक टी२० क्रिकेट खेळला आहे. मात्र, हार्दिकने स्पष्टपणे सांगितले आहे की, सध्या आपले लक्ष फक्त टी२० विश्वचषकावर आहे आणि त्यामुळेच तो याला प्राधान्य देत आहे. हार्दिकच्याच नेतृत्वात यावर्षी गुजरात टायटन्सने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर आयर्लंड दौऱ्यावर त्याला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हाफ पँट’वर क्रिकेट, नको रे बाबा! पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर चहलचे मजेशीर प्रत्युत्तर
वेस्ट इंडीजविरुद्धच्या लाईव्ह सामन्यात कर्णधार धवनने केले ‘हे’ कृत्य, समालोचकांच्याही बत्त्या गुल
चहल भाऊ लईच नशीबवान! चाहते तर सोडाच आता पत्नीच म्हणाली, “मीच तुझी सर्वात मोठी…”






