क्रिकेट विश्वात टी२० क्रिकेट २००५ साली अस्तित्त्वात आले. त्यानंतर या क्रिकेट प्रकाराने प्रेक्षकांच्या मनावर एकप्रकारे राज्य केलं आहे. आज प्रत्येकाला टी२० क्रिकेट प्रकार आवडतो. टी२० क्रिकेटने आज एक विशेष स्थान गाठले आहे आणि या प्रकारात अनेक खेळाडू सर्व देशांमध्ये टी२० स्पर्धा खेळताना दिसत आहेत.
टी२० क्रिकेट इतिहासाच्या १५ वर्षात सर्व संघांसाठी अनेक कर्णधार बनले. ज्यातील बरेच कर्णधार क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आहेत. सर्व प्रमुख संघांव्यतिरिक्त बाकी संघांसाठीही टी२० मध्ये कर्णधारपद भूषविणाऱ्या खेळाडूंची नावे तर चाहत्यांच्या जिभेवर आहेतच.
पण त्यांच्यातील टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे बरेच कर्णधार झाले आहेत, की ज्यांनी एक किंवा त्यापेक्षा जास्त सामन्यात आपल्या संघाचे नेतृत्व केले आहे. परंतु क्वचितच चाहत्यांना हे खेळाडू लक्षात असतील.
चला तर मग जाणून घेऊया अशा ५ कर्णधारांबद्दल, ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी२०त एक किंवा त्यापेक्षा जास्त सामन्यांत आपल्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र अनेकांच्या ते लक्षातही नाही.
५. जेम्स ट्रेडवेल (James Tredwell)
इंग्लंड क्रिकेट संघात आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट इतिहासात अनेक कर्णधार होऊन गेले. ज्यामध्ये केविन पीटरसन, पॉल कॉलिंगवूड, ओएन मॉर्गन किंवा जॉस बटलर यांच्यासारखे कर्णधार आठवतील. पण यांच्याप्रमाणेच इंग्लंड टी२० संघाचे नेतृत्व एकदा फिरकी गोलंदाज असलेल्या जेम्स ट्रेडवेल यानेही केले आहे.
ट्रेडवेलने २०१३ मध्ये एका टी२० सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडचे कर्णधारपद भूषविले आहे. परंतु दुर्दैवाने त्या सामन्याचा निकाल लागला नाही.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)
भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा सध्याचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळताना दिसत नाही. परंतु काही वर्षापूर्वीपर्यंत तो भारतीय संघाच्या मर्यादित षटकांच्या संघात खेळत होता. रहाणेच्या टी२० क्रिकेट कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये फक्त २० सामने खेळले आहेत.
पण फारच कमी लोकांना माहीत असेल की त्याने एकदा टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यातही भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध २ सामन्यांत नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने १ सामना जिंकला, तर एका सामन्यात पराभव स्विकारावा लागला.
काइल मिल्स (Kyle Mills)
न्यूझीलंड क्रिकेट संघ हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. न्यूझीलंडच्या संघाने टी२० क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. या संघाकडे एकापेक्षा एक दिग्गज कर्णधार होते. हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु या सर्वांमध्ये न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज काइल मिल्सलाही आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती.
मिल्सला २०१३ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या २ टी२० सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले होते. तो एका सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी झाला, तर त्याला एक सामना गमवावा लागला.
ब्रॅड हॅडिन (Brad Haddin)
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडिन बराच काळ या संघाकडून खेळत राहिला. हॅडिनने ऑस्ट्रेलियाच्या संघात खेळताना अपेक्षित कामगिरी केली नाही. परंतु ऑस्ट्रेलिया कडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळण्यात त्याला यश मिळवता आले.
जर हॅडिन विषयी बोललं तर त्याला एकदा ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. रिकी पाँटिंग आणि मायकल क्लार्क यांच्या अनुपस्थितीत हॅडिनला कर्णधारपद मिळालं होत. ज्यात पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांत त्याने संघाचे नेतृत्व केले. यामध्ये एका सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. यादरम्यान त्याच्या विजयाची टक्केवारी ५० एवढी राहिली.
विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)
भारतीय क्रिकेट संघाने २००६ साली टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताच्या टी२० क्रिकेटमध्ये एमएस धोनी, विराट कोहलीसारखे मोठे आणि यशस्वी कर्णधार आहेत. पण माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागला पहिल्याच टी२० सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती.
सेहवागने भारतासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच टी२० सामन्यात भारताचे कर्णधारपद भूषवले, आणि भारतासाठी इतिहासातील पहिला टी२० सामना जिंकला. पण सेहवागनेही कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. हे अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही.
वाचनीय लेख-
-सलग ४ चेंडूंवर ४ भारतीय महारथींना तंबूत पाठवणारा अवलिया गोलंदाज
-दुर्दैवी! ९९वर बाद झालेले १० भारतीय क्रिकेटर
-असे तीन भारतीय प्रतिभावान क्रिकेटर, जे होऊ शकतात आपल्याच आयपीएल संघाचे कर्णधार