भारतीय महिला संघ येत्या जून महिन्यात पुरुष संघासह इंग्लंड दौर्यावर जाणार आहे. या दौऱ्यात महिला संघ ब्रिस्टलच्या मैदानावर इंग्लंड संघाशी एक कसोटी सामना खेळेल. तर त्यानंतर उभय संघांमध्ये वनडे आणि टी२० सामन्यांची देखील मालिका खेळवली जाईल. या दौऱ्यासाठी महिला संघाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.
मात्र अद्याप कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याने दोन्ही संघांना बायो बबलचे कडक नियम पाळणे बंधनकारक आहे. त्याच अंतर्गत सध्या दोन्ही संघ मुंबईतील एका हॉटेलमध्ये विलगीकरणात आहेत. या दरम्यान विरंगुळा म्हणून ते सोशल मिडीयावर चाहत्यांशी संवाद देखील साधत आहेत. भारतीय महिला संघाची धाकड फलंदाज हरमनप्रीत कौरने देखील हाच मार्ग निवडला.
कोहली-धोनीबद्दलच्या प्रश्नांना दिली उत्तरे
हरमनप्रीत कौरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांशी संवाद साधणे पसंत केले. यावेळी तिने चाहत्यांना प्रश्न विचारायचे आवाहन केले होते. चाहत्यांनी देखील ही संधी साधत हरमनप्रीतला काही भन्नाट प्रश्न विचारले. ज्यातील निवडक प्रश्नांची तिने उत्तरे दिली.
यात तिला काही चाहत्यांनी विराट कोहली, एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांचे एका शब्दात वर्णन कसे करशील, असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देतांना तिने कोहलीसाठी ‘एनर्जी’ म्हणजेच उत्साह असा शब्द वापरला. तर धोनीचे वर्णन करण्यासाठी ‘लिजंड’ म्हणजेच ‘दिग्गज’ असा शब्द वापरला. रोहित शर्माचे वर्णन करतांना हरमनप्रीतने ‘गिफ्टेड’ म्हणजेच ‘प्रतिभासंपन्न’ असा शब्द वापरला. तिच्या या उत्तरांची आता चांगलीच चर्चा रंगली आहे.
कोहलीने पण दिली होती प्रश्नांना उत्तरे
काही दिवसांपूर्वी पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील इंस्टाग्रामवर अशाच प्रकारे चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली होती. या प्रश्नांमध्ये वामिकाची झलक कधी पाहायला मिळणार, तुझा डायट प्लॅन काय आहे, धोनीचे वर्णन कसे करशील, भारतीय संघाबद्दल एखादे सिक्रेट कोणते, अशा अनेक प्रश्नांचा समावेश होता. या सगळ्यांची कोहलीने दिलखुलासपणे उत्तरे दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
बासरीवादक नंतर शिखर धवन आता झाला शायर, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
आयपीएल २०२१: फलंदाजांना रहावे लागेल सतर्क, युएईतील मैदानं गाजवू शकतात ‘हे’ ५ गोलंदाज
तयारीस प्रारंभ! गांगुलीसह ‘हे’ अधिकारी दुबईत, उर्वरित आयपीएल आयोजनाबाबत करणार चर्चा