होबार्टमध्ये होणाऱ्या एफआयएच प्रो लीग २०२५-२६साठी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार बदलण्यात आला आहे. नियमित कर्णधार हरमनप्रीत सिंग याने वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली असल्याने हार्दिक सिंगला त्याच्याजागी नियुक्त करण्यात आले आहे. ही स्पर्धा २० ते २५ फेब्रुवारी दरम्यान खेळली जाणार आहे.. होबार्टच्या टास्मानिया हॉकी सेंटरमध्ये याचे सामने होणार आहेत. यामध्ये भारत स्पेन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने खेळणार आहे.
भारताने घरच्या मैदानावर नुकत्याच संपलेल्या पहिल्या लेगमधील सर्व चारही सामने गमावले. ज्यामध्ये अर्जेंटिनाकडून ०-८ असा मोठा पराभव स्विकारावा लागला होता. भारताच्या या निराशाजनक कामगिरीवर संघाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले, “राऊरकेलामध्ये आमचे प्रदर्शन निराशाजनक झाले. निकाल आमच्या पक्षात लागले नाही, मात्र आम्ही यामधून खूप काही शिकलो आणि काही सुधारणाही केल्या आहेत.”
हार्दिकने दोन वेळा ऑलिम्पिकचे कांस्य पदक जिंकले आहे. संघात अमनदीप लाकरा आणि मनमीत सिंग हे युवा खेळाडूही आहेत, त्यांनी राऊरकेलामध्ये वरिष्ठ संघासाठी पहिला सामना खेळला होता.
हरमनप्रीतच्या अनुपस्थितीबाबत हॉकी इंडियाचे वक्तव्य समोर आले आहे. त्यात म्हटले गेले, ‘हरमनप्रीत सिंग काही वैयक्तिक कारणामुळे संघाचा भाग नसणार.’
त्याचबरोबर भारतीय संघात मनिंदर सिंगची पुनरागमन झाले आहे. त्याने २०२३-२४मध्ये एफआयएप प्रो लीग खेळली होती. तसेच फॉरवर्ड अंगद बीर सिंगचेही संघात वापसी झाली आहे. तसेच अनुभवी मनप्रीत सिंगला पुन्हा एकदा दुर्लक्षित केले गेले. त्याने संघासाठी ४११ सामने खेळले आहेत. मनप्रीत, दिलप्रीत सिंग आणि कृष्ण बहादूर पाठक यांना शिस्तभंगाच्या आरोपांमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांना घरच्या मैदानावर झालेल्या प्रो लीगमध्येही घेतले नव्हते.
या लेगमध्ये भारताचा पहिला सामना २१ फेब्रुवारीला स्पेनविरुद्ध आहे. दुसरा सामना २२ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध, तिसरा सामना २४ फेब्रुवारीला स्पेनविरुद्ध आणि चौथा सामना २५ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे.
भारतीय संघ-
गोलकिपर – सूरज करकेरा, मोहित एचएस
डिफेंडर्स – अमित रोहिदास, जर्मनप्रीत सिंग, संजय, अमनदीप लाकरा, जुगराज सिंग, सुमीत, पुवन्ना चंदुरा बॉबी, यशदीप सिवाच.
मिडफिल्डर – राजिंदर सिंग, मनमीत सिंग, विवेक सागर प्रसाद, हार्दिक सिंग (कर्णधार), मोईरंगथेम रबीचंद्र सिंग, विष्णु कांत सिंग, राज कुमार पाल.
फॉरवर्ड – अभिषेक, शिलानंद लाकरा, मनदीप सिंग, अरिजीत सिंग हुंदल, आदित्या अर्जुन लालगे, अंगद बीर सिंग, मनिंदर सिंग.






