नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२१ मधील ३९ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात पार पडला आहे. हा सामना बेंगलोर संघाने ५४ धावांनी जिंकला आहे. त्यांच्या या शानदार विजयात वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याचा मोठा वाटा राहिला. मोक्याच्या क्षणी मुंबईच्या एकाहून एक सरस फलंदाजांना बाद करत त्याने विकेट्सची हॅट्रिकही घेतली आणि सामना संघाच्या बाजूनेही वळवला. या सामन्यानंतर त्याने आपल्या हॅट्रिकचा भाग असलेल्या कायरन पोलार्ड याच्याविरुद्धच्या रणनितीबाबतचा खुलासा केला आहे.
आयपीएल २०२१ च्या ३९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध हॅट्रिक घेणाऱ्या हर्षल पटेल याने खुलासा केला आहे की, त्याने शालेय स्तरावरसुद्धा कधी हॅट्रिक घेतली नव्हती. मात्र मुंबईविरुद्ध हॅट्रिक घेतल्यानंतर आता तो खूप आनंदी आहे. हर्षलने आपल्या हॅट्रिकमध्ये वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज कायरन पोलार्डला बाद केले होते. त्याच्या या विकेटसाठी संघाच्या बैठकीतच नियोजन केले असल्याची माहिती त्याने दिली आहे.
हर्षलने मुंबईच्या आक्रमक अष्टपैलू कायरन पोलार्डच्या विकेटचे वर्णन अतिशय समाधानकारक असे केले आहे. तो म्हणाला, ‘आम्ही संघाच्या बैठकीमध्ये देखील याबाबत आधीच विचार करून ठेवला होता, की पोलार्डसारखा फलंदाज बाहेर जाणारा चेंडू सोडणार नाही. पण यॉर्कर टाकल्यास तो चुकू शकतो. सामन्यावेळी मी त्याला हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी झालो.’
हर्षल पटेल पुढे म्हणाला, ‘मी क्लब संघ, आयपीएल संघ आणि हरियाणा संघासाठी खेळतो. मला फलंदाजीत आणि गोलंदाजीत चांगले योगदान द्यायचे आहे. माझे हेच ध्येय आहे आणि जोपर्यंत मी क्रिकेट खेळत आहे तोपर्यंत मी गोलंदाजीसह फलंदाजीतही माझे योगदान देईल.”
मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्रिक घेणारा हर्षल पुढे म्हणाला, ‘ही माझ्या आयुष्यातील पहिली हॅट्रिक आहे. शाळेतही मी कधी हॅट्रिक घेतली नव्हती. मी आयपीएलमध्ये सहाव्यांदा हॅट्रिकजवळ पोहचलो होतो. पण पहिल्यांदाच यशस्वी झालो आहे. मला यावर विश्वास ठेवण्यासाठी वेळ लागेल. मला कसे वाटत आहे याचे वर्णन मी करू शकत नाही. मी खूप आनंदात आहे.’
‘मला विश्वास करायला वेळ लागेल. मला वाटते की, मी याचे वर्णन शब्दांत करू शकत नाही. माझ्या दृष्टिकोनातून, माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करणे आनंददायी आहे. संघाबद्दल बोलताना, आम्ही पॉइंट टेबलकडे पाहत नाही. कारण असे केल्याने प्रक्रियेवर लक्ष केंद्रित होत नाही. दोन पराभवानंतर अशा प्रकारे सामन्यात परत येणे आमच्यासाठी आवश्यक होते. आम्हाला असाच खेळ सतत दाखवायचा आहे.’
बेंगलोरचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल इंडियन प्रीमियर लीगमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही टी -२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने, निराश नसल्याचे सांगितले आहे. तो म्हणतात की, निवड त्याच्या हातात नाही. ‘मला कधीच पश्चात्ताप झाला नाही. मी माझ्या आयुष्यातील वेळेनुसार माझ्या बाजूने सर्वोत्तम निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत निवडीचा प्रश्न आहे, ते माझ्या हातात नाही,’ असे त्याने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
RRvSRH, Live: संघ बदलांसह हैदराबाद अन् राजस्थान मैदानावर, नाणेफेक जिंकून संजूचा फलंदाजीचा निर्णय