आज प्रो कबड्डीमध्ये हरयाणा स्टीलर्स आणि तमील थलायवाज यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ प्रो कबड्डीमध्ये या वर्षी सामील झालेले आहेत. हरयाणा संघाचा कर्णधार सुरिंदर नाडा आहे तर तमील थलायवाजचा कर्णधार अजय ठाकूर आहे. दोन्ही संघाने या मोसमामध्ये तीन सामने खेळले आहेत. त्यातील एक सामना जिंकण्यात दोन्ही संघाना यश आले आहे.
हरयाणाचा संघ तमील थलायवाजपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. या संघाचे डिफेंडर आणि रेडर चांगल्या लयीत आहेत. डिफेन्समध्ये सुरिंदर नाडाने खेळलेल्या तिन्ही सामन्यात हाय ५ मिळवला आहे. त्याला मागील सामन्यात हाय ५ मिळवत मोहित चिल्लरने उत्तम साथ दिली होती. हरयाणाने पहिला सामना यु मुंबाविरुध्द गमावला होता तो फक्त एका गुणाने गमावला होता. दुसरा सामना गुजरातविरुध्द झाला, हा सामना बरोबरीत सोडवण्यात या संघाला यश मिळाले होते. तिसरा सामना गुजरात विरुध्द झाला आणि हा सामना हरयाणा संघाने एकतर्फी जिंकला होता.
हरयाणा संघाने जरी फक्त एक सामना जिंकला असला तरी त्यांनी तिन्ही सामन्यात उत्तम खेळ केला आहे. रेडींगमध्ये वझीर सिंग आणि विकास कंडोला उत्तम कामगिरी करत आहेत.
तमील थलायवाज संघाची स्थिती थोडी नाजूक आहे. या संघाने तीन सामने खेळले आहेत . त्यातील दोन सामने त्यांना गमवावे लागले आहेत. जे दोन सामने या संघाने गमावले त्यात पहिल्या सामन्यात एकतर्फी पराभव झाला होता. दुसरा सामना त्यांनी एका गुणाने बेंगलुरु बुल्स विरुद्ध गमावला. तिसरा सामना त्यांनी बेंगलुरु बुल्स विरुद्ध खेळला आणि जिंकला. या सामन्यात त्यांनी चांगली कामगिरी केली. हा सामना त्यांच्या हातातून निसटून जाऊ शकला असता पण डिफेन्स आणि रेडींगमध्ये त्यांनी कमी चुका केल्या. त्यांचे विरोधी बेंगलुरु बुल्सने जास्त चुका केल्या त्यामुळे ते सामना हरले.
तमील थलायइवाज संघात अजय ठाकूर आहे पण त्याला या मोसमात लय गवसली नाही. के. प्रपंजन हा संघासाठी रेडींगमध्ये गुण मिळवतो आहे. डिफेन्समध्ये अमित हुड्डा आणि सी. अरुण यांनी मागील सामन्यात चांगली कामगिरी केली होती. या खेळाडूंवर तमील थलायइवाज अवलंबून राहणार आहे.
दोन्ही संघाची एकंदरीत स्थिती सारखीच आहे. दोन्ही संघ आपले विजयी अभियान सुरु ठेवण्याचा प्रयन्त करतील. हा सामना खूप अटातटीचा होईल असे वाटते. दोन्ही संघाला विजयाची सारखीच संधी असली तरी हा सामना हरयाणा संघ जिंकण्याची जास्त शक्यता आहे.