प्रो कबड्डीमध्ये आज ७७ वा सामना जयपुर पिंक पँथर्स स्टीलर्स या आहे. झोन ए मध्ये असणाऱ्या या दोन संघाचा हा पहिलाच सामना आहे. जयपुरचा संघ या मोसमात दुखापतींनी ग्रस्त आहे. त्यांचे मुख्य खेळाडू मंजीत चिल्लर, के. सिल्वामनी आणि जसवीर हे दुखापतींमुळे बाहेर आहेत. तब्बल ७३ लाख रुपये देऊन विकत घेतलेल्या के. सिल्वामनी दुखापतींमुळे फक्त एक सामना खेळू शकला आहे.
या मोसमात जयपुर संघाने नऊ सामन्यात पाच विजय मिळवले तर चार पराभव स्वीकारले आहेत. आजच्या सामन्यात जसवीर देखील नसल्याने हा संघ पूर्णपणे नवखा भासतो आहे. या संघातील सर्वात जास्त सामने खेळलेला खेळाडू सोमवीर शेखर आहे त्याने ४८ सामने खेळले आहेत. त्यानंतर रेडर पवन कुमारचा क्रमांक लागतो त्याने ४२ सामने खेळले आहेत. नवनीत गौतम खूप अनुभवी खेळाडू आहे परंतु त्याने प्रो कबड्डीमध्ये फक्त ३० सामने खेळले आहेत. या तीन खेळाडूंना वगळता बाकी संघ नवखा आहे.
मागील सामन्यात जयपुरला खूप मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांना पटणा पायरेट्सने ४७-२१ असे परभूत केले होते. या सामन्यात जयपुरचा डिफेन्स पूर्णपणे निकामी करत प्रदीप नरवाल याने २१ रेडींग गुणांची कमाई केली होती. त्यामुळे या सामन्यात जयपुरला डिफेन्समध्ये मजबूत कामगिरी करावी लागेल अन्यथा त्यांना या सामन्यात देखील पराभवाला सामोरे जावे लागेल. जयपुर संघात पवन कुमार वगळता अन्य कोणताही रेडर गुण मिळवण्यात सक्षम नाही. जर पवन बाद झाला तर त्याला लवकरात लवकर मैदानात आणावे लागेल.
हरयाणा स्टीलर्स सध्या उत्तम लयीत आहेत. घरच्या मैदानावरील मागील पाच सामन्यात दोन विजय, दोन पराभव तर एक सामना बरोबरीत सोडवला आहे. काल झालेल्या पुणेरी पलटण विरुद्धच्या सामन्यात त्यांना रेडींगमध्ये जास्त गुण मिळवता आले नव्हते. वजीर सिंग आणि प्रशांतकुमार राय यांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे हा सामना हरयाणाला गमवावा लागला होता. दीपक दहिया याने रेडींगमध्ये उत्तम कामगिरी केली होती. त्याच्याकडून आजच्या सामन्यात देखील अश्याच कामगिरीची अपेक्षा हरयाणाचे पाठीराखे करत असतील.
या सामन्यात हरयाणा संघाला विजयाची जास्त संधी आहे. जयपुरचा संघ हरयाणा स्टीलर्स समोर जास्त प्रश्न उपस्थित करेल असे वाटत नाही. हरयाणाचा संघ सध्या पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर असणाऱ्या गुजरातचे आणि हरयाणाचे ४६ गुण आहेत. परंतु एक सामना जास्त खेळल्याने हरयाणा दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज हरयाणा स्टीलर्सने हा सामना जरी बरोबरीत सोडवला तरी ते पहिल्या क्रमांकावर येथील. घरच्या मैदानावर शेवटचा सामना जिंकत घरच्या प्रेक्षकांसमोर अव्वल स्थानावर येण्याची संधी हरयाणा स्टीलर्स संघाला आहे.