अबूधाबी। गुरुवारपासून (१० मार्च) अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु झाला आहे. अबूधाबीच्या शेख जायेद, स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवशी अफगाणिस्तानच्या हशमतुल्लाह शाहिदीने द्विशतकी खेळी करत मोठा विक्रम केला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्तानकडून शाहिदीने ४४३ चेंडूत नाबाद २०० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने २१ चौकार आणि १ षटकार मारला. त्यामुळे तो अफगाणिस्तानचा कसोटीत द्विशतक करणारा इतिहासातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी अफगाणिस्तानकडून कसोटीमध्ये कोणीही द्विशतकी खेळी केली नव्हती.
ही खेळी करताना त्याने कर्णधार असगर अफगाणसह ३०७ धावांची चौथ्या विकेटसाठी भागीदारी रचली. अफगाणने १६४ धावांची खेळी केली. त्यांनी केलेली त्रिशतकी भागीदारी ही अफगाणिस्तानकडून केलेली सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. एवढेच नाही तर त्यांच्या भागीदारीमुळे अफगाणिस्तानने १६०.४ षटकात ४ बाद ५४५ धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे ही त्यांची कसोटीतील सर्वोच्च सांघिक धावसंख्याही ठरली आहे.
झिम्बाब्वेकडून पहिल्या डावात रायन बर्ल, सिकंदर रजा आणि विक्टर न्यॅऊची यांना प्रत्येकी १ विकेट घेण्यात यश मिळाले.
अफगाणिस्तानने पहिला डाव घोषित केल्यानंतर फलंदाजासाठी उतरलेल्या झिम्बाब्वेकडून प्रिन्स मसावरे आणि केविन कासुझा यांनी डावाची सुरुवात केली. त्यांनी सलामीला चांगली खेळी करताना दुसऱ्या दिवसाखेर विकेट जाऊ दिली नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवसाखेर झिम्बाब्वे संघ १७ षटकांनंतर बिनबाद ५० धावांवर खेळत असून मसावरे २९ धावांवर आणि कासुझा १४ धावांवर नाबाद आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तर्क असलेले प्रश्न विचारा’, आर अश्विनला टी२० मध्ये खेळवण्याच्या प्रश्नावर भडकला विराट कोहली