पर्थ। ॲशेस मालिकेतील तिसऱ्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यांनी इंग्लंडला १ डाव आणि ४१ धावांनी पराभूत केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने दुसऱ्या डावात ५ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. इंग्लंडने आज ४ बाद १३२ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. काल नाबाद असणारी जोडी डेव्हिड मलान आणि जॉनी बेअरस्टो यांची भागीदारी आज जास्त रंगली नाही. हेझलवूडने या दोघांनाही बाद केले.
मात्र मलानने संयमी अर्धशतकी खेळी केली पण त्याला त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयश आले. त्याने १३५ चेंडूत ५४ धावा केल्या. याबरोबरच त्याला बाकीच्या फलंदाजांनीही साथ दिली नाही. इंग्लंडकडून मोईन अली(११), क्रेग ओव्हरटन(१२) आणि ख्रिस वोक्स(२२) यांनी धावा केल्या. इंग्लंडने या डावात सर्वबाद २१८ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून हेझलवूड (५/४५), पॅट कमिन्स (२/५३), मिचेल स्टार्क (१/४४) आणि नॅथन लिऑन (२/४२) यांनी बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक:
इंग्लंड पहिला डाव: सर्वबाद ४०३ धावा
ऑस्ट्रेलिया पहिला डाव: ९ बाद ६६२ धावा (घोषित)
इंग्लंड दुसरा डाव: सर्वबाद २१८ धावा
सामनावीर: स्टीव्ह स्मिथ (२३९ धावा)