इंडियन प्रीमियर लीग आता नव्या बदलांसह पुढच्या हंगामात क्रिकेट रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात सर्व संघ व्यस्त झाले आहेत. यातच पंजाब किंग्स संघाचे मालक नेस वाडिया यांनी केएल राहुलला रिटेन करण्याच्या प्रश्नावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या लिलावात केएल राहुलला कायम ठेवण्यात येईल की नाही हे नेस वाडिया यांनी सांगितले आहे.
राहुल असणार का पंजाबचा कर्णधार?
एका वाहिनीशी बोलताना ते म्हणाले, “केएल राहुल व्यतिरिक्त, संघात इतर अनेक खेळाडू आहेत. फक्त एका खेळाडूने संघ बनत नाही आणि मी हे नेहमीच सांगितले आहे. प्रत्येक खेळाडूचे स्वतःचे एक महत्त्व आहे. आपल्याला या गोष्टींशी जुळवून घ्यावे लागेल.”
नेस वाडिया यांनी राहुलचे खूप कौतुकही केले आहे. ते पुढे म्हणाले, ‘मला वाटतं राहुलची कामगिरी अभूतपूर्व आहे आणि त्याने एक आदर्श ठेवला आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्यासोबत जे घडलं त्यानंतर तो ज्या प्रकारे परतला आहे ते खूप प्रशंसनीय आहे. तो एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. पण मी आधी म्हटल्याप्रमाणे क्रिकेटमध्ये एक संघ ११ खेळाडूंनी बनलेला असतो. जोपर्यंत खेळाडू रिटेन करण्याचा प्रश्न आहे, तर जे काही होईल त्यासाठी आम्ही तयार आहोत.”
पंजाबची पुन्हा एकदा निराशजनक कामगिरी
आयपीएलच्या मागील चार हंगामात पंजाब किंग्स दरवेळी ६ व्या स्थानावर राहिला आहे. यातील दोन हंगामात केएल राहुलने (२०२० आणि २०२१) नेतृत्व केले आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीला फारसे यश मिळाले नसले तरी, राहुल हा स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. २०२० मध्ये सर्वाधिक धावा केल्याबद्दल त्याने ऑरेंज कॅप जिंकली होती. तर यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर होता. यंदाच्या आयपीएलमध्ये केएल राहुलच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. अनेक सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, केएल राहुलने वैयक्तिकरित्या चांगली कामगिरी केली होती. त्याने अनेक सामन्यांमध्ये धडाकेबाज खेळ्या खेळल्या, त्याने आयपीएल २०२१ मध्ये शतकही नोंदवले होते. पुढील हंगामापासून आणखी दोन नवीन संघ आयपीएलमध्ये येतील आणि त्यानंतर संघांची संख्या १० इतकी होईल. त्यासाठी मेगा लिलावही होणार आहे.