भारतीय पुरूष संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नुकताच त्याच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने चर्चेत आला होता. यामध्ये त्याने संघात घडणाऱ्या काही गोष्टींचा उल्लेख केला होता. त्याच्या या पोस्टवर चाहते चांगलेच नाराज झाले होते. यामुळे भारताच्या एका दिग्गजाने त्याला सोशल मीडियापासून दूर राहण्यास सांगितले आहे.
भारताने नागपूरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध टी२० सामना जिंकला. या विजयानंतर भारताचा राजकीय पक्ष कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी गंभीरचे कौतुक करत पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी लिहिले, ‘तो भारताच्या पंतप्रधान मोदीनंतर सर्वात कठीण काम करत आहे.’ त्या पोस्टला गंभीरने प्रतिक्रिया देत म्हटले, ‘काही काळानंतर लोकांना कळेल प्रशिक्षकांचे अधिकार असे काही नसते. लोक त्याच्याबाबत जे बोलतात ते ऐकून हसायला येते (संघातील काही सदस्यांसोबत त्याचे पटत नाही).’
गंभीरच्या या पोस्टनंतर मात्र एकाच चर्चेला सुरूवात झाली. काही चाहत्यांनी गंभीरला आत काय चालले आहे हे न सांगण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर सोशल मीडियावर काय चर्चा सुरू आहे, त्याकडे दुर्लक्ष करण्याचाही सल्ला दिला होता. आता भारताचा माजी कर्णधार अजिंक्य राहाणेने एका क्रिकेटच्या कार्यक्रमावेळी गंभीरला तोच सल्ला दिला आहे.
रहाणे म्हणतो, “माझा गौतमला एकच सल्ला आहे की त्याने सोशल मीडियापासून दूर राहावे. चाहते त्याच्याबद्दल काय बोलत आहेत याचा त्याने अधिक विचार करू नये. तो जेव्हा खेळाडू होता तेव्हा तो चांगला खेळला. आता तो भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत आहे, जे सर्वात महत्वाचे आणि कठीण आहे.”
“त्याने सोशल मीडियापासून दूर राहात संघावर लक्ष केंद्रित करावे. हे माझे स्वत:चे मत आहे. सध्या आपल्यासाठी महत्वाचे विश्वचषक असून त्यावर लक्ष देऊ,” असेही राहाणे पुढे म्हणाला.
गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताची टी२० कामगिरी उत्तम असली तरी कसोटी आणि वनडेमध्ये लागलेल्या निकालांमुळे चाहते त्याच्यावर नाराज आहेत. त्याच्या प्रशिक्षण काळात भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध तिन्ही कसोटी सामने गमावले. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धही दोन सामन्यांची कसोटी मालिका गमावली. त्याचबरोबर भारताने २०२४मध्ये श्रीलंकेविरुद्ध आणि २०२६मध्ये न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिका गमावल्या आहेत.
गंभीरचे विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या वरिष्ठ खेळाडूंशी पटत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. चाहत्यामध्येही याबाबत चर्चा सुरू असतात. ते दोघे भारतासाठी केवल वनडे खेळत असून त्यांना त्यांच्या कामगिरीने संघ निवडकर्त्यांना त्यांच्या फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले.






