२०१७ हे वर्ष जवळ जवळ संपत आले आहे. भारतीय संघासाठी हे वर्ष चांगले ठरले असले तरीही यावर्षी कोहली कुंबळे वाद, दिल्ली प्रदूषण ही प्रकरणे चांगलीच गाजली. याबरोबरच बेन स्टोक्सचे मारामारी प्रकरणही चांगलाच चर्चेचा विषय बनला होता.
असेच २०१७ मध्ये गाजलेले हे टॉप ५ वादग्रस्त प्रकरणे:
५. जडेजाचे वादग्रस्त पोस्ट: यावर्षी भारताचा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे जेवढा चर्चेत राहिला त्यापेक्षा जास्त त्याने मीडियावर टाकलेल्या पोस्टमुळे राहिला.
काही दिवसांपूर्वी जडेजाने हुक्का पीत असलेला त्याचा फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केला होता. त्यासाठी त्याला अनेकांनी ट्रोल केले होते. तसेच त्याआधी जडेजाला एका चाहत्याने अजय जडेजा म्हणून हाक मारली होती, त्यावेळी जडेजाने चिडून एक ट्विट केले होते ज्यात त्याने म्हटले होते कि मी ९ वर्षे देशासाठी खेळतोय तरीही लोकांना माझे नाव लक्षात राहत नाही.
४. बेन स्टोक्स मारामारी प्रकरण: इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला सप्टेंबर महिन्यात केलेल्या मारामारीच्या प्रकरणावरून अटक करण्यात आली होती. हे प्रकरण अॅशेस मालिकेच्या आधी झाल्याने चांगलेच गाजले होते.
स्टोक्सवर ब्रिस्टोल नाईटक्लबमध्ये मारहाण केल्याचा आरोप ठेवला होता. त्यामुळे त्याच्यावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बंदी घातली होती. या बंदीमुळे स्टोक्सला सध्या सुरु असलेल्या अॅशेस मालिकेत खेळता आले नाही.
३. स्मिथचे ब्रेन फेड: ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टिव्ह स्मिथवर ४ मार्च ते ८ मार्च दरम्यान झालेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चुकीच्या पद्धतीने डीआरएसची मागणी केल्याच्या प्रकरणावरून चांगलीच टीका झाली होती.
या सामन्यादरम्यान स्मिथला जेव्हा सामना पंचांनी बाद दिले होते तेव्हा त्याने काय करावे हे न सुचल्यामुळे ड्रेसिंग रूमकडे बघून काय करू असे विचारले होते, पण क्रिकेटमध्ये असे विचारणे चुकीचे असल्याने स्मिथला अखेर बाद देण्यात आले होते. याबद्दल भारतीय कर्णधार विराट कोहलीने तक्रार देखील केली होती.
२. दिल्ली प्रदूषण: भारत विरुद्ध श्रीलंका संघात २ डिसेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर पार पडलेला तिसरा कसोटी सामना तेथील प्रदूषणामुळे चांगलाच गाजला होता.
या सामन्यादरम्यान श्रीलंकन खेळाडू मास्क घालून मैदानात उतरले होते. तसेच दोन्ही संघातील गोलंदाजांना या प्रदूषणाचा खूप त्रास झाला होता. या त्रासामुळे त्या खेळाडूंना मैदानावरच उलटी देखील झाली होती.
१. कोहली कुंबळे वाद: यावर्षी सर्वात जास्त चर्चिले गेलेले प्रकरण म्हणजे भारतीय कर्णधार विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वाद. कुंबळेने मागील वर्षी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर सर्व सुरळीत चालले असतानाच चॅम्पिअन्स ट्रॉफीनंतर कोहली आणि कुंबळे वाद सर्वांसमोर आला होता.
कुंबळेच्या प्रशिक्षणाची शैली आपल्याला पटत नसल्याचे विराटने बीसीसीआयला सांगितले होते. त्यानंतर कुंबळेने अखेर प्रशिक्षण पदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणावरून अनेकांनी विराटवर टीका केली होती.