भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराटच्या कर्णधारपदावर समाधान व्यक्त करताना तो एक महान कर्णधारांपैकी एक बनू शकतो असे म्हटले आहे. गांगुली त्याच्यातील नेतृत्वगुणांमुळे ओळखला जातो. भारतीय संघाचा उत्कृष्ट कर्णधारांमध्ये गांगुलीचे नाव घेतले जाते. त्यामुळेच त्याने विराटबद्दल असे विधान करणे विराटसाठी कौतुकास्पदच आहे.
सौरव गांगुली इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले की विराटला महान भारतीय कर्णधारांपैकी एक बनण्याची गुणवत्ता मिळाली आहे, आणि त्यात शंका नाही. माझ्या मते पुढचे १५ महिने त्याच्यासाठी महत्वाचे असतील, जेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया,इंग्लंड दौरे आणि विश्वचषक खेळणार आहे.माझ्यामते तो योग्य मार्गावर आहे. तो त्याचा संघ तयार करत आहे, तो खेळाडू निवडून त्यांना संधी देत आहे.
भारतीय संघ न्यूझीलंड आणि श्रीलंकेला हरवेल यात शंका नाही.जेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाईल तेव्हा भारतीय संघाला आव्हान मिळेल पण मला वाटत की या संघाकडे तिथेही चांगले खेळण्याची क्षमता आहे.
विराट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आत्ताच झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत ३६ च्या सरासरीने १८० धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग ९ वनडे सामने जिंकले होते.
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आत्तापर्यंत ४० वनडे सामन्यांपैकी ३१ सामने जिंकले आहेत तर कसोटीत २९ सामन्यांपैकी १९ सामने जिंकले आहेत आणि ५ टी २० सामन्यांपैकी ३ सामने जिंकले आहेत.