एकेकाळी चार मातब्बर फुटबॉल क्लब अशी गोव्याची ओळख होती. कोलकतामधील प्रसिद्ध अशा तीन क्लबपेक्षा जास्त दबदबा त्यांचा होता. धेंपो स्पोर्टस क्लब, साळगावकर स्पोर्टस क्लब, चर्चिल ब्रदर्स एफसी आणि स्पोर्टींग क्लब द गोवा यांची भारतामधील जास्त प्रतिष्ठेच्या क्लबमध्ये गणना व्हायची. यातील पहिल्या तीन क्लबनी असंख्य विजेतिपदे मिळविली. स्पोर्टींग क्लब दोन वेळा अगदी जवळ आला, पण अंतिम अडथळा पार करू शकला नाही.
आता गोव्यातील फुटबॉल म्हणजे वेगळे विश्व झाले आहे. भारतामधील अव्वल साखळी गाजविल्यानंतर परिस्थिती इतकी रसातळाला गेली की येथील फुटबॉलला अस्तित्व टिकविण्यासाठी झगडावे लागले. हिरो इंडियन सुपर लिगला (आयएसएल) प्रारंभ झाल्यापासून एफसी गोवा संघाने केलेल्या प्रभावी वाटचालीमुळे या प्रांतामधील फुटबॉलमध्ये पुन्हा चेतना निर्माण झाली.
पाच वर्षांत एफसी गोवा हा प्रत्येक गोवेकराच्या आवडीला क्लब बनला आहे. गोव्यातील फुटबॉल पद्धतीमध्ये त्यांनी आपली पाळेमुळे खोलवर रुजविली आहेत. दिर्घकालीन योजना आणि मुलभूत पातळीवरील विकासासाठी यापूर्वीच कार्य सुरु झाले आहे.
एफसी गोवा हा आयएसएलमध्ये सातत्याने कामगिरी करणारा क्लब असल्याने यास हातभार लागला आहे. प्ले-ऑफमधील त्यांचे स्थान केवळ एकदाच हुकले आहे. गेल्या दोन मोसमात तर सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने चमकदार खेळाडूंशी करार केले, तसेच आक्रमक फुटबॉलचे प्रदर्शन केले. याद्वारे या क्लबने भारतीय फुटबॉलमध्ये स्पॅनीश शैली आणली आहे.
एफसी गोवाचे अध्यक्ष अक्षय टंडन यांनी सांगितले की, आमचा क्लब संपूर्ण समुदायाचे प्रतिनिधीत्व करणारा आहे असे वाटते. आम्ही जतन करीत असलेल्या मुल्यांचा हा फार मोठा भाग बनला आहे. आमच्या चाहत्यांना सहभागी करून घेतल्याशिवाय आम्ही कोणतीही गोष्ट करीत नाही. आमचे उपक्रम, मार्केटींग आणि सिझन तिकीटे याचा चाहते मोठा भाग असतात. हिरो आयएसएलमध्ये सीझन तिकीट घेतलेल्या एक हजार प्रेक्षकांचा टप्पा ओलांडलेला आमचा एकमेव क्लब असावा. यंदा आम्ही पंधराशे सीझन तिकीटधारक चाहत्यांचे लक्ष्य ठेवले आहे.
टंडन यांचे विधान सुसंगत आहे. पराक्रम करणाऱ्या वरिष्ठ संघाच्या जोडीला एफसी गोवाने अप्रतिम पिरॅमीड पद्धत बसविली आहे. यात युवा ऍकॅडमी आणि वयोगट संघ यांच्या माध्यमातून वरिष्ठ संघाला पूरक अशी सांगड घातली जाते. एफसी गोवा उदयोन्मुख संघाने 2018-19च्या मोसमात गोवा प्रो लीग जिंकली. ही कामगिरी करताना त्यांनी या प्रांतामधील चर्चिल ब्रदर्स, धेंपो आणि स्पोर्टिंग अशा प्रस्थापीत नावांना मागे टाकले.
14, 16, 18 आणि 20 वर्षांखालील संघातून वरिष्ठ संघात खेळण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या खेळाडूंना वाटचाल करता यावी म्हणून सुस्पष्ट पद्धत आहे. महंमद नवाझ, लिस्टन कोलॅको, सॅव्हीयर गामा आणि जोनाथन कार्डोझो असे खेळाडू केवळ दोन वर्षांत वरिष्ठ पातळीपर्यंत प्रगती करून गेले. या मोसमात आणखी खेळाडू त्यांच्या पावलावर पाऊल टाकतील.
संघात सर्वाधिक स्थानिक खेळाडू असलेला संघ म्हणजे एफसी गोवा होय. गेल्या मोसमात हा आकडा आठ होता, जो इतर कोणत्याही क्लबपेक्षा जास्त होता. महत्त्वाचे म्हणजे मंदार राव देसाई, ब्रँडन फर्नांडीस, सेरीटॉन फर्नांडीस आणि लेनी रॉड्रीग्ज असे सर्व खेळाडू संघात नियमित असतात.
टंडन यांनी सांगितले की, आम्ही चाहत्यांना हे सारे देणे लागतो. आम्ही त्यांच्यासाठी हे करतो आणि समुदायाशी एकरूप होण्याचा आमचा उद्देश असतो. आमच्या संघात गोवेकर आणि स्थानिक खेळाडू असले पाहिजे यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. त्यामुळे या सर्व गोष्टींचे श्रेय चाहत्यांना, गोवेकर समुदायाला आणि त्यांच्या फुटबॉलवरील निष्ठेला द्यावे लागेल. त्यांनी आम्हाला जे काही दिले आहे त्याची परतफेड करू शकलो तर मग त्यांचा स्वाभीमान हाच आमच्यासाठी ठेवा असेल.
एफसी गोवाचे घरच्या मैदानावर सामने असतात तेव्हा गोवेकर फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर येताना आपल्या कार सजवून आणतात. आपले चेहरे सुद्धा त्यांनी रंगविलेले असतात. ते ध्वज फडकावित असतात. हे वातावरण भारून टाकणारे असते.
एफसी गोवा मैदानावर झपाटून टाकणारा खेळ करतो. फोर्सा गोवा फाऊंडेशनच्या माध्यमातून वर्षभर एक हजारहून जास्त मुलांना ट्रेनींग दिले जाते. अशा पद्धतीने मैदानाबाहेरही कौतुकास्पद कार्य चालते, जे संघाची घोडदौड पाहता दिर्घ काळ कायम राहील असे दिसते.