वनडे क्रिकेटमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा असो किंवा सर्वाधिक वेळा 50 हून अधिक धावा करण्याचा विक्रम असो, सर्वत्र एकच नाव आघाडीवर आहे. ते म्हणजे, विराट कोहली. विराटला त्याच्या वेगवान धावांच्या गतीमुळे ‘रनमशीन’ म्हणून ओळखतातच. अशात त्याला आणखी एक नाव मिळाले आहे, ते ‘चेज मास्टर’ होय. रविवारी (दि. 08 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सहावा सामना पार पडला. यामध्ये विराटच्या विस्फोटक खेळीचा समावेश होता.
विराटच्या नावे वनडेत सर्वाधिक सरासरी
विराट कोहली (Virat Kohli) याने या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 116 चेंडूत 85 धावांची जबरदस्त अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 6 चौकारांचाही समावेश होता. अशात विराट वनडे क्रिकेटमध्ये कमीत कमी 1000 धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक सरासरी (Highest average in an ODI chases minimum 1000 Runs) असणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. सक्रिय असलेल्या खेळाडूंमध्ये आणि त्याच्यात खूप मोठे अंतर आहे.
वनडेत कमीत कमी 1000 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराटची सरासरी सर्वाधिक 64.31 इतकी राहिली आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिविलियर्स आहे. त्याने 56.81च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडला होता. तसेच, यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल बेव्हन तिसऱ्या असून वनडेत कमीत कमी 1000 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याची सरासरी 56.50 इतकी राहिली आहे.
याव्यतिरिक्त सध्या सक्रिय असलेले फलंदाज जो रूट या यादीत चौथ्या स्थानी आहे. वनडेत कमीत कमी 1000 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याची सरासरी 55.33च्या इतकी राहिली आहे. तसेच, पाचव्या स्थानी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम असून या बाबतीत त्याची सरासरी 54.73 इतकी राहिली आहे. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क हा या यादीत सहाव्या स्थानी आहे. त्याने कमीतकमी 1000 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 53.92च्या सरासरीने धावा केल्या होत्या.
वनडेत आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक सरासरी असणारे फलंदाज (कमीत कमी 1000 धावा)
64.31 – विराट कोहली*
56.81 – एबी डिविलियर्स
56.50 – मायकल बेव्हन
55.33 – जो रूट
54.73 – बाबर आजम
53.92 – मायकल क्लार्क
हेही वाचा-
मागील पराभवाचा वचपा काढणार नेदरलँड? टॉस जिंकत न्यूझीलंडला दिले फलंदाजीचे आमंत्रण, घातक गोलंदाज ताफ्यात
विराटने संपवली सचिनची बादशाहत! ‘या’ विक्रमात ‘मास्टर ब्लास्टर’ला पछाडत बनला जगातला टॉपर फलंदाज