क्रिकेटच्या इतिहासात 12 मार्च हा दिवस खूप खास आहे. 18 वर्षांपूर्वी म्हणजेच 2006 मध्ये या दिवशी एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील एक अतिशय रोमांचक सामना खेळला गेला होता. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जोहान्सबर्गच्या वाँडरर्स स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात यजमान संघानं एका विकेटनं संस्मरणीय विजय मिळवला होता.
या सामन्यात ऑस्ट्रेलियनानं प्रथम फलंदाजी करताना 4 गड्यांच्या मोबदल्यात 434 धावांचा डोंगर रचला. एकदिवसीय सामन्यात प्रथमच कोणत्या संघानं 400 धावांचा टप्पा गाठला होता. ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगनं या सामन्यात 105 चेंडूत 13 चौकार आणि 9 षटकारांसह 164 धावांची खेळी केली होती. त्याचवेळी मायकेल हसी (81), सायमन कॅटिच (79) आणि ॲडम गिलख्रिस्ट (55) यांनीही धमाकेदार फलंदाजी केली.
जेव्हा ऑस्ट्रेलियन संघानं 434 धावा केल्या, तेव्हा कदाचित कोणीही विचार केला नसेल की दक्षिण आफ्रिकेचा संघ हे आव्हान गाठू शकतो. परंतु त्यानंतर जे घडलं ते ऐतिहासिक होतं! दक्षिण आफ्रिकेनं 50 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर 435 धावांचं लक्ष्य गाठलं. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा लक्ष्याचा पाठलाग होता. दक्षिण आफ्रिकेचा हा विक्रम आजही कायम आहे. दक्षिण आफ्रिकेशिवाय एकदिवसीय सामन्यात 400 हून अधिक धावांचं लक्ष्य अद्याप कोणत्याच संघाला गाठता आलेलं नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या या ऐतिहासिक विजयाचा हिरो होता हर्शल गिब्स. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या गिब्सनं 111 चेंडूत 175 धावांची शानदार खेळी केली. या दरम्यान त्यानं 7 षटकार आणि 21 चौकार मारले. त्या सामन्यात गिब्सनं 142 मिनिटं फलंदाजी केली. सोबतीला कर्णधार ग्रॅमी स्मिथनं 90 आणि यष्टीरक्षक फलंदाज मार्क बाउचरनं नाबाद 50 धावा केल्या. बाउचरनं विजयी चौकार ठोकलां. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पाच सामन्यांची मालिका 3-2 अशी खिशात घातली.
या सामन्यात रिकी पाँटिंग आणि हर्शल गिब्स यांची संयुक्तपणे ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवड करण्यात आली. त्या दिवशी एकूण 87 चौकार आणि 26 षटकार मारले गेले. ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिक लुईसनं 10 षटकात 113 धावा दिल्या. त्याकाळी हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाजी स्पेल होता.
सामन्यानंतर एक आणखी धक्कादायक बाब उघडकीस आली. हर्षल गिब्सनं 175 धावांची मॅचविनिंग खेळी चक्क दारूच्या नशेत खेळली होती. स्वतः गिब्सनं याची पुष्टी केली आहे. गिब्सनं त्याच्या ‘टू द पॉइंट: द नो-होल्ड्स-बॅरर्ड’ या आत्मचरित्रात सांगितलं की, त्या सामन्याच्या आदल्या रात्री त्यानं भरपूर दारू प्यायली होती आणि सामन्याच्या दिवशी तो हंगओव्हर झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
Video : सामन्यादरम्यान ‘फिक्सर’ म्हणताच मोहम्मद आमिर भडकला, चाहत्याशी ‘तू-तू-मैं’
“…तर पृथ्वी शॉ पुढचा उन्मुक्त चंद ठरू शकतो”, क्रिकेटच्या दिग्गजानं शेअर केला रणजी ट्रॉफीचा व्हिडिओ
IPL 2024 मध्ये तुमच्या आवडत्या संघाचं नेतृत्व कोणता खेळाडू करेल, जाणून घ्या एका क्लिकवर