श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (२५ जुलै) ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ बाद १६४ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. या सामन्यातून कर्णधार म्हणून पदार्पण करणाऱ्या शिखर धवनने फलंदाजीत आपल्या नावे एक खास विक्रम जमा करून घेतला.
धवनच्या नावे जमा झाला हा विक्रम
कर्णधार म्हणून पहिला टी२० सामना खेळणाऱ्या शिखर धवनने या सामन्यात भारतासाठी सलामी देताना ३६ चेंडूमध्ये ४ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ४६ धावांची खेळी केली. याच बरोबर धवनने टी२० मध्ये कर्णधार म्हणून पहिला सामना खेळताना भारताकडून सर्वाच्च धावा बनण्याचा विक्रम केला.
धवनच्या आधी हा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावे होता. भारतीय क्रिकेट संघाने २००६ मध्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या पहिल्यावहिल्या टी२० सामन्यात सेहवागने संघाचे नेतृत्व करताना ३४ धावा काढल्या होत्या. अजिंक्य रहाणे याने २०१३ मध्ये झिम्बाब्वे दौर्यावर भारतीय संघाचे टी२० सामन्यात नेतृत्व करताना ३३ धावांचे योगदान दिले होते.
भारताची सन्मानजनक धावसंख्या
पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकात १६४ धावा बनविल्या. कर्णधार शिखर धवन व संजू सॅमसन यांनी अनुक्रमे ४६ व २७ धावा ठोकल्या. चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक झळकावले. इशान किशन याने अखेरच्या काही षटकांत मोठे फटके खेळून भारताला सन्मानजनक मजल मारून दिली. श्रीलंकेसाठी वेगवान गोलंदाज दुष्मंता चमिराने दोन गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
पहिल्या टी२० मध्ये मैदानात उतरताच शिखराच्या नावे जमा झाला नकोसा विक्रम; धोनीला सोडले मागे
कमनशिबी शॉ! पृथ्वी ठरला पदार्पणात ‘गोल्डन डक’ होणारा दुसरा भारतीय