पुणे – जय काळेच्या शानदार गोल हॅट्ट्रिकच्या जोरावर पीसीएमसी अकॅडमीने हॉकी पुणे लीग 2024-25 च्या वरिष्ठ विभागीय सामन्यात इन्कम टॅक्स, पुणे संघाला 3-3 असे बरोबरीत रोखले.
नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात सहा गोलांची बरसात झाली. दोन्ही संघांनी चुरशीचा खेळ केला. जय काळेने (7व्या) पीसीएमसी अकॅडमीचे खाते उघडले. त्यानंतर कर्णधार आशुतोष लिंगेने (21व्या – पीसी) पेनल्टी कॉर्नरचे गोलामध्ये रूपांतर करताना इन्कम टॅक्स संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.
मात्र, त्यांचे बरोबरीचे समाधान अवघे चार मिनिटे टिकले. जय काळेने(25व्या) पुन्हा एकदा पीसीएमसी अकॅडमीला आघाडीवर नेले. मात्र, चिराग मानेमुळे (27व्या) प्रतिस्पर्धी इन्कम टॅक्सने पुन्हा बरोबरी साधली.
शेवटचे दोन गोल दोन मिनिटांच्या फरकाने झाले. यावेळी अथर्व कांबळेमुळे (36व्या – पीसी) पेनल्टी कॉर्नरवरील गोलने इन्कम टॅक्सला 3-2 असे आघाडीवर नेले. मात्र, फॉर्मात असलेला जय काळे (37व्या) पुन्हा एकदा पीसीएमसी अकॅडमीच्या मदतीला धावला.
ज्युनियर विभागातील सामन्यात ब गटात क्रीडा प्रबोधिनीने हॉकी लव्हर्स स्पोर्ट्स क्लबचा 12-1 असा धुव्वा उडवला. कार्तिक पठारे (4 गोल) सूरज शुक्ला (3 गोल) त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. दीपक चव्हाण (2 गोल) तसेच अनिकेत मेहर (9वा), राजरत्न कांबळे (33वा) आणि पियुष गायकवाडमुळे (42वा) क्रीडा प्रबोधिनीने गोलसंख्या 12वर नेली.
हॉकी लव्हर्स स्पोर्ट्स क्लबकडून एकमेव गोल प्रणय गरसुंदने(6वा – पीसी) केला.
निकाल
कनिष्ठ विभाग
ब गट: क्रीडा प्रबोधिनी ’ब’: 12 (अनिकेत मेहर 9वा – पीसी; शूराज शुक्ला – 21वा पीसी. 40वा, 56वा; कार्तिक पठारे 27वा, 32वा, 35वा, 43वा; राजरत्न कांबळे 33वा; पियुष गायकवाड 42वा-पीसी, दीपक चव्हाण. 54वा, 59वा) विजयी वि. हॉकी लव्हर्स स्पोर्ट्स क्लब: 1 (प्रणय गरसुंद 6वा – पीसी). हाफटाईम: 3-1
वरिष्ठ विभाग
इन्कम टॅक्स, पुणे: 3 (आशुतोष लिंगे 21वे – पीसी; चिराग माने 27वे; अथर्व कांबळे 36वे – पीसी) विजयी वि. पीसीएमसी अकॅडमी: 3(जय काळे 8वे, 25वे, 37वे). हाफटाईम: 2-1