भुवनेश्वर। आज(7 डिसेंबर) 14 व्या हॉकी विश्वचषकात ब गटातील सामने होणार आहेत. यातील दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध आयर्लंड असा होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.00 वाजता कलिंगा हॉकी स्टेडीयम, भुवनेश्वर येथे रंगणार आहे.
या दोन्ही संघांना स्पर्धेत टीकून राहण्यासाठी विजय आवश्यक आहे. कारण या दोन्ही संघांचे गुण हे 1 आहेत. त्यांच्या गटात गुणतालिकेत आॅस्ट्रेलिया अव्वल क्रमांकावर असून त्यांनी त्यांचे पहिले दोन्ही सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तसेच चीनने आयर्लंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांना टक्कर देताना बरोबरी केल्याने 2 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
त्यामुळे आयर्लंड आणि इंग्लंड संघ आज पूर्ण ताकदीने आणि विजयाच्या इराद्याने मैदानात उतरतील.
या स्पर्धेतील इंग्लंडचा पहिला सामना चीनशी झाला होता. या सामन्यात 2-2 अशी बरोबरी झाली होती. तसेच त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांना गतविजेत्या आॅस्ट्रेलिया विरुद्ध 3-0 असा एकतर्फी पराभव स्विकारावा लागला होता.
पण इंग्लंडच्या संघात तरुण खेळाडूंबरोबरच अनुभवी खेळाडूंचाही समावेश असल्याने आयर्लंडला ते कडवी झुंज देऊ शकतात. त्यांच्या संघात वॉलेस जॅचरी, वॉलर जॅक असे युवा खेळाडू आहेत.
तसेच त्यांच्या संघातील मिडफिल्डर बॅरी मिडलटनचा ही चौथी विश्वचषक स्पर्धा आहे. त्यांचा अनुभवी खेळाडू अॅडम डीक्सोनच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. त्याने इंग्लंडकडून 200 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. त्याचबरोबर इयान सोलन आणि हॅरि मार्टीन सारखे खेळाडू आयर्लंडला धोकाजायक ठरु शकतात.
इंग्लंडने 2010 आणि 2014 च्या विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती. ते दोन्हीही विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर होते. तसेच 1986 च्या विश्वचषकाचे उपविजेते होते. ही त्यांची विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी आहे.
तसेच त्यांनी यावर्षी पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला 2-1 ने पराभूत करत कांस्य पदक पटकावले होते. त्याचबरोबर 2018 च्या सुलतान अझलान शहा कप स्पर्धेतही त्यांनी रौप्यपदकाची कमाई केली होती.
दुसरीकडे जागतिक क्रमवारीत 10 व्या क्रमांकावर असलेला आयर्लंडच्या संघाला पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाने 2-1 अशा फरकाने पराभूत केले आहे. तसेच दुसऱ्या सामन्यात नवख्या चीनबरोबर त्यांना 1-1 अशा बरोबरीत समाधान मानावे लागले आहे.
त्यामुळे ते या स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी इंग्लंड विरुद्ध विजय मिळवता नाही आला तरी बरोबरी करण्याचा प्रयत्न करती. ज्यामुळे त्यांना उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी अजून एक संधी मिळेल.
28 वर्षांनंतर विश्वचषकात खेळणारा आयर्लंड याआधी ते 1978 आणि 1990 च्या विश्वचषकात खेळले होते. पण मागील काही वर्षापासून त्यांच्या संघात अनेक सुधारणा झाल्या आहेत.
ते 2016च्या ऑलिंपिकसाठी पात्र ठरले होते. तसेच 2016च्या युरो हॉकी चॅम्पियनशीप या स्पर्धेतही ते तिसऱ्या स्थानावर राहिले होते. आयर्लंडच्या संघातील 14 खेळाडूंना युरोप लीगचा अनुभव आहे. तसेच 10 खेळाडू 2016च्या ऑलिंपिकमध्ये खेळलेले आहेत.
त्यामुळे त्यांच्याकडूनही चांगल्या खेळाची आपेक्षा आहे. पण इंग्लंडचा संघही विजय मिळवण्यासाठी आतुर असले. त्यामुळे या दोन्ही संघात करो या मरोचा मुकाबला रंगेल.
आमने – सामने
याआधी हे दोन संघ शेवटचे स्पेनमध्ये पार पडलेल्या विश्वचषक सराव स्पर्धेत एकमेकांसमोर आले होते. यात या दोन संघात दोन सामने झाले होते. या दोन्ही सामन्यात अगदी थोड्या फरकाने आयर्लंडने बाजी मारली होती.
तसेच या दोन संघात आत्तापर्यंत 2013 पासून 12 सामने झाले आहेत. यातील 4 सामने आयर्लंड आणि 7 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. तसेच विश्वचषकात फक्त एकवेळा हे दोन संघ आमने-सामने आले होते. यात इंग्लंडने विजय मिळवला होता.
आज होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध आयर्लंड सामन्याचे थेट प्रक्षेपण थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क, दूरदर्शनवर आणि एफआयएचच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर होणार आहे.
असे आहेत संघ:
आयर्लंड: हार्टे डेव्हिड (गोलकीपर, कर्णधार), बेल जोनाथन, बेल मॅथ्यू, कार्गो ख्रिस, नेलसन मॅथ्यू, साऊथर्न अॅलन, मॅगी युजीन, शिम्मींन्स कर्क, ओ डोनोग्यु शेन, मुरे सिन, डार्लिंग मिशेल, रॉबसन मिशेल, फिट्झ गेराल्ड डेव्हिड (गोलकीपर), वॉल्श दराघ, ग्लेगहॉर्न पॉल, हार्टे कोनर, डंकन जेरेमी, कोल ली, लॉरे स्टुअर्ट.
इंग्लंड: गिब्सन हॅरी(गोलकिपर), एम्स डेव्हिड, कॅलनन विल, बॅरी मिडलटन, जॉर्ज पिनेर(कर्णधार, गोलकीपर), इयान सोलन(कर्णधार), हॅरि मार्टीन, अॅडम डीक्सोन, गॉल जेम्स, ग्लेगोर्ने मार्क, रॉपर फिल (कर्णधार), सॅनफोर्ड लिआम, टेलर ल्यूक, वॉलेस जॅचरी, वॉलर जॅक, होर्न मायकल, कोंडोन डेव्हिड, अॅन्सेल लिआम.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: चिवट चीनसमोर गतविजत्या ऑस्ट्रेलियाला रोखण्याचे आव्हान