भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर झालेल्या बाद फेरीच्या दुसऱ्या सामन्यात फ्रान्सने चीनला १-० असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
हॉकी विश्वचषकात चीन पहिल्यांच खेळत असून फ्रान्सही २८ वर्षानंतर पुनरागमन करत आहे. ते १९७१ आणि १९९०च्या विश्वचषकात खेळले आहेत.
या दोन संघामध्ये विश्वचषकात हा पहिलाच सामना झाला आहे. तसेच २०१३पासून फ्रान्स आणि चीन यांमध्ये तीन सामने झाले आहेत. यातील दोन सामन्यात चीन तर एक सामना फ्रान्सने जिंकला आहे.
आजच्या सामन्यात जे पराभूत होतील ते स्पर्धेच्या बाहेर पडणार म्हणून या सामन्यात दोन्ही संघासाठी विजय महत्त्वाचा होता.
सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी कॉर्नर मिळाली. मात्र कर्णधार विक्टर चार्लेटचा ड्रॅगफ्लिक शॉट चीनी गोलकिपर वांग कॅयूने थांबवला. त्यानंतरही फ्रान्सचे हल्ले सुरूच होते.
पहिल्याच सत्रात फ्रान्सला एकूण चार पेनल्टी कॉर्नर मिळाल्या. चीननेही बचावात्मक पवित्रा घेत एकही गोल होऊ दिला नाही. या सत्रात चेंडूवर फ्रान्सचेच वर्चस्व होते.
तसेच दुसऱ्या सत्रात चीनी संघ दोन वेळा पेनल्टी सर्कलमध्ये गेला होता. तिसऱ्या सत्रात चीनने त्यांचा खेळ उंचावत एक पेनल्टी कॉर्नर मिळवली. तसेच ते पाच वेळा पेनल्टी सर्कलमध्येही गेले. मात्र त्यांना फ्रान्सची बचावफळी तोडण्यात यश येत नव्हते. याच वेळी ३७६व्या मिनिटाला ब्रॅन्की मॅक्सिमिलियनने असिस्ट केलेल्या चेंडूवर टिमोथीने गोल करत फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
चौथ्या आणि शेवटच्या सत्रात चीनची सामना बरोबरी करण्याची झुंज सुरू झाली. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना चीनला पेनल्टी कॉर्नर मिळाली. मात्र द्यु तलाकेकडून ही सुवर्णसंधी थोडक्यात मुकली.
आता जागतिक क्रमवारीत २०व्या स्थानावर असणाऱ्या फ्रान्सचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना १२ डिसेंबरला दोन वेळेच्या विश्वविजेता संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: न्यूझीलंडला पराभूत करत इंग्लंडचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
–पुजाराच कौतूक करताना बुमराहच्या या विश्वविक्रमाकडे होतेय दुर्लक्ष
–रोनाल्डोचे मेस्सीला आव्हान, चाहते आले टेन्शनमध्ये