भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर रंगलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकाच्या आज (1 डिसेंबर) झालेल्या आठव्या सामन्यात जर्मनीने पाकिस्तानला 1-0 असे पराभूत केले. या सामन्यात जर्मनीकडून मिल्टकाऊ मार्कोने विजयी गोल केला.
दोन्ही संघानी सामन्याला आक्रमकतेने सुरूवात केली. अटीतटीच्या या सामन्यातील पहिल्या दोन सत्रात एकही गोल झाला नाही. तर दुसऱ्या सत्रात जर्मनीने अनेक संधी गमावल्या.
यावेळी सध्या जागतिक क्रमवारीत 13व्या स्थानावर असणाऱ्या पाकिस्तानने ऑलिंपिक कांस्य विजेता आणि जागतिक क्रमवारीत 6व्या स्थानावर असणाऱ्या जर्मनीला गोल करण्यापासून 36 मिनिटे रोखून धरले.
तिसऱ्या सत्रामध्ये जर्मनीने उत्कृष्ठ खेळ केला. पाकिस्तानच्या बचावाची फळी मोडत मार्कोने या सामन्यातील एकमेव विजयी गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर पाकिस्तानकडूनही गोल करण्याच्या अनेक संधी मुकल्या.
तसेच या सामन्यात एकच पेनल्टी कॉर्नर मिळाली. जर्मनीला मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात त्यांना अपयश आले. पाकिस्तानचा गोलकिपर इम्रान बटनेही उत्तम कामगिरी करत जर्मनीला अधिक गोल करण्यापासून रोखले.
शेवटचे सहा मिनिटे बाकी असताना मिल्टकाऊने परत एक गोल केला. यावर पाकिस्तानने रिव्ह्यू घेतला यावेळी तो चेंडू जर्मन स्ट्रायकरच्या पायाला लागून गेल्याने तो गोल बाद झाला.
या सामन्यात पहिल्या सात सामन्यांपेक्षा वेगळीच लढत बघायला मिळाली. दोन्ही संघाचा बचाव अप्रतिम होता. पण अखेर जर्मनीला पाकिस्तानची बचाव फळी मोडण्यात यश आले.
या दोन संघाचे पुढील सामने 7 डिसेंबरला आहेत. यावेळी पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंड्स आणि जर्मनी विरुद्ध मलेशिया असे सामने होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: अर्धा डझनपेक्षा जास्त गोल करत नेदरलॅंड्सने केला मलेशियाचा दारूण पराभव
–अष्टपैलू खेळाडू म्हणतो, विराटने सांगितले तर ओपनिंगही करेल
–पृथ्वी शाॅ नसेल तर रोहित शर्माला सलामीला घ्या, पहा कुणी केलीय मागणी