भुवनेश्वर। १४व्या हॉकी विश्वचषकात आज (५ डिसेंबर) झालेला मलेशिया विरुद्ध पाकिस्तान सामना १-१ असा बरोबरीत सुटला. यामुळे या दोन्ही संघांची या स्पर्धेतील पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम आहे.
या सामन्यात मलेशियाकडून फेझल सारी आणि पाकिस्तानकडून अतीक मुहम्मद या दोघांनी प्रत्येकी एक गोल केला.
चार विश्वचषक जिंकलेल्या पाकिस्तान संघाला या स्पर्धेत पहिल्या सामन्यात जर्मनीकडून ०-१ असे पराभूत व्हावे लागले तर आजचा मलेशिया विरुद्धचा सामना बरोबरीत राहिल्याने त्यांच्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम आहे. तसेच त्यांना पहिला गोल करण्यास दुसऱ्या सामन्याची वाट पहावी लागली.
तसेच मलेशियाही त्यांच्या पहिल्या सामन्यात नेदरलॅंड्सकडून ०-७ अश्या मोठ्या फरकाने पराभूत झाला होता. यामुळे दोन्ही संघाला पहिला विजय मिळवण्याची गरज असल्याने त्यांनी आक्रमकपणे खेळाला सुरूवात केली.
या सामन्यात दोन्ही संघाला पहिल्या सत्रातच गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. मात्र दोन्ही संघाच्या गोलकिपर्सने उत्कृष्ठ कामगिरी करत त्या पेनल्टी कॉर्नर अडवल्या. या सत्रात मलेशियाचे वर्चस्व होते. मात्र कोणत्याच संघाला या १५ मिनिटांमध्ये गोल करता आला नाही.
दुसऱ्या सत्रातही चेंडूवर मलेशियाचाच सर्वाधिक ताबा होता. मात्र पाकिस्तानने मोठ्या लांबीचे शॉट्स मारण्याय सुरूवात केली पण मलेशियाच्या बचावफळी समोर ते अपयशी ठरत होते.
दोन्ही संघांनी त्यांच्या खेळ उंचावण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. तसेच या तिसऱ्या सत्रात दोघांनाही दोन पेनल्टी कॉर्नर मिळाल्या. मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात कोणालाही यश येत नव्हते.
तीनही सत्रात सामना ०-० असा झाल्याने पाकिस्तानने या सामन्यातील पहिला गोल नोंदवला. मुहम्मदने ५१व्या मिनिटाला गोल करत सामन्यात संघाला १-० अशी आघाडी घेण्यात मदत केली. यावेळी पाकिस्तानच्या खेळाडूंनी जल्लोष केला. मात्र मलेशियाच्या सारीने त्यांच्या आनंदावर विरजण घातले. त्याने ४ मिनिटांच्या फरकाने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणली.
या स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी दोन्ही संघाची धडपड सुरूच होती. मात्र त्यांच्या गोलकिपर्सने केलेल्या कामगिरीने सामना अनिर्णीत राहिला.
पाकिस्तानने पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या जर्मनी विरुद्ध उत्तम खेळाचा फॉर्म कायम ठेवत मलेशियाला पहिल्या तीन सत्रात गोल करण्याची संधी दिली नाही. तसेच दोन्ही संघाने आज अप्रतिम कामगिरी केली.
या संघाचे पुढील सामने ९ डिसेंबरला आहेत. यामध्ये मलेशिया विरुद्ध जर्मनी आणि पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंड्स असे सामने होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: तीन वेळच्या जगज्जेत्या नेदरलँड्सचा पराभव करत जर्मनीने मिळवला सलग दुसरा विजय
–ISL 2018: चेंचोच्या भरपाई वेळेतील गोलमुळे बेंगळुरूची नॉर्थइस्टशी बरोबरी
–आॅस्ट्रेलियाच्या या वेगवान त्रिकूटापेक्षाही इशांत शर्माने अॅडलेडवर खेळले आहेत सर्वाधिक कसोटी सामने