भुवनेश्वर। कलिंगा हॉकी स्टेडीयम, भुवनेश्वर, ओडिशा येथे सुरु असलेल्या 14 व्या हॉकी विश्वचषकाच्या आजच्या चौथ्या दिवशी ड गटाचे सामने रंगणार आहेत. यातील पहिला सामना हा नेदरलँड विरुद्ध मलेशिया संघात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 5 वाजता सुरुवात होईल.
हे दोन संघ पाचव्यांदा विश्वचषकामध्ये आमने सामने येणार आहेत. याआधी या दोन संघात विश्वचषकात झालेल्या 4 सामन्यापैकी 3 सामन्यात नेदरलँडने विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात मलेशियाने विजय मिळवला आहे. तसेच 2013 पासून विश्वचषक व्यतिरिक्त हे दोन संघ 2 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात नेदरलँडने विजय मिळवला आहे.
जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असणारी नेदरलँडची कामगिरी मागील काही महिन्यात चांगली झाली आहे. त्यांनी यावर्षी जूलैमध्ये मायदेशात ब्रेडा येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले होते.
तसेच आत्तापर्यंत त्यांनी 1973, 1990 आणि 1998 असे तीन वेळी हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच 2014 चा विश्वचषकाचे यजमानपदही भुषवताना त्यांनी रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्यांना 2014 च्या हॉकी विश्वचषकात आॅस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.
तसेच अनुभवी ड्रॅग फ्लिकर मिंक वॅन देर विडेनही नेदरलँडच्या संघात परतला आहे. त्यामुळे नेदरलँडचा आत्मविश्वास आणखी वाढणार आहे. त्याचबरोबर प्रृईजर मिक्रो, ब्रिंकमन थिएरी आणि जेरोइन हर्ट्झबेगर या तीन खेळाडूंवरही सर्वांचे लक्ष असणार आहे.
त्याचबरोबर स्पिडी टायगर अशा टोपननावाने ओळखल्या जाणाऱ्या मलेशियाच्या संघालाही कमी लेखून चालणार नाही. कारण त्यांचीही मागील काही काळापासून चांगली कामगिरी झाली आहे. त्यांनी मागीलवर्षी बांगलादेश येथे झालेल्या हॉकी एशिया कप स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले आहे.
त्याचबरोबर जकार्ता येथे पार पडलेल्या एशियन गेम्स 2018 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. मात्र 2014 चा विश्वचषक मलेशियासाठी खास ठरलेला नाही. त्यांना या विश्वचषकात 12 व्या आणि तळातल्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
12 व्या क्रमांकावर असणाऱ्या मलेशिया संघात फेझल आणि फित्री सारी या दोन भावांच्या कामगीरीचेही औत्सुक्य आहे. त्याचबरोबर हसन अझुआन, ताजुद्दीन तेंग्कू आणि निक रोझेमी हे देखील प्रतिस्पर्धी संघाला चांगली लढत देऊ शकतात.
त्यामुळे आजच्या या सामन्यात स्पिडी टायगर्स म्हणून ओळखणाऱ्या मलेशियाला तीन वेळच्या विश्वचषक विजेत्या नेदरलँडला रोखण्याचे आव्हान असणार आहे.
असे आहेत संघ:
नेदरलँड: बार्ट सँडर, बेकर बिली (कर्णधार), बल्क लार्स, ब्लॅक पिरमिन(गोलकीपर), प्रृईजर मिक्रो, ब्रिंकमन थिएरी, जेरोइन हर्ट्झबेगर, क्रुन जोरीट, द गेउस जोनास, द वूग्द बॉब, द वँग सँडर, केम्परमन रॉबर्ट, शुरमन ग्लेन, वॅन एस सेव, वॅन दम थेज, वॅन देर वेन सॅम (गोलकीपर), वॅन देर विर्डेन मिंक, वेर्गा वॅलेंटाइन.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर विजय
–हॉकी विश्वचषक २०१८: नवख्या चीनने इंग्लंडला बरोबरीत रोखले