भुवनेश्वर। चार वेळेचा विश्वविजेता पाकिस्तान आज (1 डिसेंबर) 14व्या हॉकी विश्वचषकात जर्मनीला भिडणार आहे. ड गटातील हा दुसरा सामना असून त्याला संध्याकाळी 7 वाजता सुरूवात होणार आहे. हा सामना कलिंगा स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
विश्वचषकात हे दोन संघ आज तिसऱ्यांदा आमने-सामने येणार आहेत. आधी झालेल्या दोन सामन्यात दोन सामन्यात दोघांच्याही नावावर प्रत्येकी एक-एक विजय आहे. तसेच 2013पासून विश्वचषक व्यतिरिक्त हे दोन संघ 4 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. त्यामध्ये जर्मनीने 3 विजय मिळवले असून पाकिस्तानला फक्त एकच विजय नोंदवता आला.
विश्वचषकाचा इतिहास बघता बाकीच्या संघापेक्षा पाकिस्तान यशस्वी ठरला आहे. मात्र 1990नंतर त्यांची स्थिती वाईट झाली असून सध्या ते जागतिक क्रमवारीत 13व्या स्थानावर आहेत.
तसेच पाकिस्तान क्रिडा संघटनेचे ढिसाळ कामकाज यामुळे संघाला विश्वचषकात सहभागी होण्यासाठी आर्थिक निधीच्या समस्यांना सामोरे जावे लागले होते. तर शेवटच्या क्षणी होम अप्लायंस कंपनीने नऊ मिलीयन पाकिस्तानी रूपयाची मदत केली. तसेच या स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या पत्रकारांचा व्हिसा नाकारण्यात आला आहे.
1984च्या विश्वविजेत्या संघातील ताकीर दार हे पाकिस्तानचे प्रशिक्षक आहेत. तर 28 वर्षीय रिझवान मुहम्मद संघाचे नेतृत्व करणार आहे.
1994ला शेवटचा विश्वचषक जिंकणाऱ्या पाकिस्तानची कामगिरी मागील आठ वर्षापासून खालावत चालली आहे. 2010मध्ये दिल्लीत झालेल्या विश्वचषकानंतर ते 12व्या स्थानावर होते मात्र 2014मध्ये ते पात्र ठरले नव्हते.
या विश्वचषकास पात्र ठरण्यासाठीही पाकिस्तानला खूप झगडावे लागले. लंडनमध्ये झालेल्या हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्य फेरीत सातव्या स्थान पटकावल्याने ते विश्वचषकासाठी पात्र ठरले आहे.
ड्रॅगफ्लिकमध्ये तरबेज असलेले अली मुबाशर आणि बिलाल अलीम यांच्यावर पाकिस्तानची मदार असणार आहे.
दुसरीकडे 2008 आणि 2012च्या ऑलिंपिकचे सुवर्णपद पटकावणाऱ्या जर्मनी संघाने 2016च्या रियो ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक मिळवले होते. पण तरीही या संघाची मागील विश्वचषकातील कामगिरी निराशाजनक झाली होती.
जर्मनी जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असून त्यांची या वर्षात वाईट कामगिरी झाली आहे.
2012ला लंडन ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या जर्मन संघातील कर्णधार हॅनेर मार्टीन आणि हॉक टोबीयास या दोघांचा अनुभव आजच्या सामन्यात कामी येऊ शकतो. तसेच ऱ्हुर ख्रिस्तोफर आणि ग्रॅंबुश मॅट्स हे संघाला महत्त्वपूर्ण क्षणी स्थिरता देऊ शकतात.
भुतकाळ मागे ठेवत आजच्या सामन्यात हे दोन्ही संघ विजय मिळवण्याच्या आशेने मैदानात उतरणार आहे.
असे आहेत संघ:
पाकिस्तानचा संघ: रिझवान मुहम्मद (कर्णधार), बट इम्रान (गोलकिपर), अली मुबाशर, अर्शद तोसिक, मेदमूद रशीद, इरफान जुनीयर मुहम्मद, इरफान मुहम्मद, शान अली, अब्बास मझहर (गोलकिपर), बिलाल अलीम, भुट्टा उमर, बट अम्माद, झुबेर मुहम्मद, अतीक मुहम्मद, कादीर मुदम्मद फैसल,अब्बास तासावर, अहमद अजाझ, मेहमूद अबु
जर्मनीचा संघ: हॅनेर मार्टीन (कर्णधार), म्युलर मॅथियस, ग्रॅंबुश मॅट्स, विंडफेडर लुकास, वेलेन निकलास, गुयेन डॅन, हरब्रुच टीम, हॉक टोबीयास, ग्रॅंबुश टॉम, लिंकोगेल डेटर, ऱ्हुर ख्रिस्तोफर, विंक फर्डिनांड, वॉल्टर टोबीयस (गोलकिपर), मिल्टकाऊ मार्को, फुच्स फ्लोरीयन, फुर्क बेनेडीक्ट, ग्रोब जोहान्सन, अॅली विक्टर (गोलकिपर)
महत्त्वाच्या बातम्या-
–हॉकी विश्वचषक २०१८: ‘स्पीडी टायगर’ मलेशिया समोर आज तीनवेळच्या विश्वविजेत्या नेदरलँडचे आव्हान
–आॅस्ट्रेलियात भारतीय सलामीवीरांची धमाकेदार कामगिरी
–ISL 2018: जमशेदपूर-नॉर्थइस्ट लढतीत प्ले-ऑफ प्रवेशासाठी चुरस