श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस यजमान संघाच्या नावावर राहिला. पाकिस्तानने पहिल्या डावात ७ बाद १९१ धावा केल्या होत्या. यासिर शाह १३ धावांवर नाबाद आहे. तत्पूर्वी, श्रीलंकेने पहिल्या डावात ३७८ धावा केल्या होत्या. पाकिस्तान अजूनही श्रीलंकेपेक्षा १८७ धावांनी पिछाडीवर आहे.
https://twitter.com/ICC/status/1551552923125137409?t=AYlM37isPeNEXZy-VdDyjQ&s=19
श्रीलंकेला दिवसाच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. कालचा नाबाद फलंदाज वेललागे ११ धावांवर बाद झाला. यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो ५१ धावा करून माघारी परतला. श्रीलंकेचा अखेरचा फलंदाज रमेश मेंडिसने ३५ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. अशाप्रकारे श्रीलंकेचा डाव ३७८ धावांवर संपुष्टात आला. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि यासिर शाह यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
पाकिस्तानच्या डावाची सुरुवातही खराब झाली. त्यांनी पहिल्या सामन्यातील शतकवीर अब्दुल्ला शफीकचा बळी दुसऱ्याच चेंडूवर गमावला. लंचपर्यंत पाकिस्तानने ५ षटकांत १५ धावा केल्या होत्या. त्यानंतर इमाम-उल-हक आणि कर्णधार बाबर आझम यांच्यात ३५ धावांची भागीदारी झाली. मात्र, बाबर १६ धावा करून प्रभात जयसूर्याचा बळी ठरला. इमाम-उल-हकही ३२ धावा करून बाद झाला. मोहम्मद रिझवान आणि फवाद आलम चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवू शकले नाहीत. दोघांनी प्रत्येकी २४ धावा केल्या.
प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर आघा सलमानने चांगली फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. सलमान ६२ धावांवर बाद झाला. तो बाद होताच दिवसाचा खेळ संपवण्यात आला. दुसऱ्या दिवसाखेर पाकिस्तानने ६९.४ षटकांत ७ बळी गमावून १९१ धावा केल्या. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानला झटपट बाद करून मोठे आघाडी घेण्याचा प्रयत्न श्रीलंका करताना दिसेल. मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने आपल्या नावे केला होता. त्यामुळे श्रीलंकेचा प्रयत्न मालिका बरोबरीत सोडवण्याचा असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
यादव-रविची फिरकी आता वेस्ट इंडिजला दाखवणार तारे
INDvsWI। विंडीजला हरवत ‘गब्बर’ने केली ‘कॅप्टन कुल अन् दादा’ची बरोबरी
माजी क्रिकेटपटूने जय शहांना दाखवला आरसा; म्हणाला, “तुम्ही करताय ते क्रिकेटसाठी…”






