-आदित्य गुंड
बोरिस बेकर आणि आंद्रे आगासी हे दोघे आपापल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते. एकेमेकांविरुद्ध खेळलेल्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये बेकरने विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक साधली होती.
सलग तीन पराभव झाल्याने हताश झालेल्या आगासीला बेकरविरुद्ध जिंकण्यासाठी काय वेगळे करावे हे कळत नव्हते. त्याने बेकरच्या सामन्यांच्या व्हिडीओ टेप्स पहायला सुरुवात केली. पुन्हापुन्हा त्या टेप्स पाहिल्यानंतर बेकरच्या एका विशिष्ट सवयीने आगासीचे लक्ष वेधले.
बेकर जेव्हा जेव्हा सर्व्हिस करी त्या त्या वेळी तो जीभ बाहेर काढत असे. जीभ डावीकडे वळलेली असेल तर त्याची सर्व्हिस कोर्टच्या बाहेरच्या बाजूने जाई. जीभ जर मध्ये असेल तर सर्व्हिस कोर्टच्या मध्यावर असे. हीच ती वेगळी गोष्ट जी आगासी शोधत होता. त्याला बेकरची सर्व्हिस भेदण्यासाठीचे रहस्य सापडले होते.
त्यानंतर बेकर आणि आगासी एकमेकांच्या विरुद्ध ११ सामने खेळले. या ११ सामन्यांपैकी फक्त एक सामना बेकरला जिंकता आला तर उरलेले १० सामने आगासीने जिंकले. अगोदर जिंकलेले ३ सामने आणि नंतरचा १ असे एकूण ४ सामने बेकरने जिंकले. निवृत्त होताना त्याचे आगासी विरुद्धचे रेकॉर्ड होते ४ विरुद्ध १०.
बेकरची प्रत्येक सर्व्हिस आपण भेदू शकतो हे बेकरला कळू न देणे हे आगासीसाठी जास्त अवघड होते. त्याला कळाले असते तर आगासीला पुढचे सामने जिंकणे जिकिरीचे झाले असते. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला बेकरची जीभ बाहेर असणे गरजेचे होते. बेकरला आपले रहस्य कळू नये म्हणून आगासी त्याला काही गेम जिंकू देई आणि मग मोक्याचा क्षण बघून त्याची सर्व्हिस भेदत असे.
आपली सर्व्हिस आगासी प्रत्येक वेळी कसा भेदू शकतो हे बेकरला कळायला काही मार्ग नव्हता. “आगासी जणू माझ्या मनात काय आहे ओळखतो.” असे तो आपल्या बायकोला म्हणत असे. पण आगासी त्याचे मन नाही तर जीभ ओळखत होता.
बेकर निवृत्त झाल्यानंतर काही वर्षांनी त्याच्याबरोबर बीअर पिताना आगासीने त्याला आपले रहस्य सांगितले तेव्हा बेकर फक्त खुर्चीवरून पडायचा बाकी राहिला होता.